बलुतेदार घरांवर विकृत परंपरेची दरवर्षी कोसळते कुर्‍हाड

0

मुंबई (राजा आदाटे)। पत्रीसारकार आणि पुरोगामी परंपरा असलेल्या सांगली जिल्ह्यात नेर्ले गावात यात्रेच्या दिवशी बाराबलुतेदारांची विकृतपणे धिंड काढली जाते. त्याला परंपरा आणि मिरवणुकीचे गोंडस नाव दिले जाते. या परंपरेत बारा बलुतेलुतेदारातील तीन पुरूषांना स्त्रीयांचे वेष परिधाण करून त्यांची दुसर्‍या पुरुषाशी लग्ने लावली जातात आणि संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक अर्थात धींड काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील नेर्ले या गावात हि परंपरा सुरू आहे. गावातील मोहन नांगरे पाटील या प्रतिष्ठित घराण्यात हा प्रकार घडतो. यात्रेच्या दरम्यान होणार्‍या या प्रकाराला जोगण्या भावळी उत्सव’ या नावाने संबोधण्यात येते. यात्रेच्या दिवशी जोगा’ म्हणजे वर पुरूष आणि जोगी’ म्हणजे वधू पुरूष यांची निवड नांगरे पाटील यांच्या घरात केली जाते. जोगा मध्ये नाभिक, सुतार आणि कुंभार समाजातील पुरूष तर जोगीसाठी गुरव, चर्मकार आणि परिट समाजातील पुरूषांची निवड केली जाते. गुरव, चर्मकार आणि परीट पुरूषांना स्त्रीयांचा वेष परिधान केला जातो. त्यांची लग्ने लावली जातात आणि संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. यावेळी ग्रामस्थ आणि तरूणांकडून त्यांची यथेच्च
टिंगलटवाळी केली जाते.

बाराबलुतेदारांनी हि परंपरा कायम जोपासण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. तसे न केल्यास गावावर अरिष्ठ ओढविण्याची भिती वर्तविण्यात येते. तसेच प्रतिष्ठित घराण्यातील व्यक्ती मृत पावत असल्याचे सांगून हि परंपरा जबरदस्तीने कायम ठेवली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विरोध करणारांना होते बेदम मारहाण
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या रूढीला सुरूवातीला कुणीही विरोध करत नव्हते, मात्र काही वर्षापूर्वी परीट आणि चर्मकार समाजातील भावांनी साडी नेसण्यास विरोध केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी चर्मकार समाजातील सेवानिवृत्त शिक्षकावर हि वेळ आल्यानंतर त्यांनी पळ काढला असता त्यांना शोधण्यासाठी गाडया सोडण्यात आल्या. यावेळी मारहाणीच्या भितीमुळे शिक्षकाच्या बंधूने निमूटपणे हा अन्याय सहन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

चौकशी करून कारवाई करा अशा अनिष्ठ रूढी परंपरेला कुणी खतपाणी घालत असेल किंवा जबरदस्ती केली जात असेल तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्यानमंत्री राजकुमार बडोले यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
– रामदास आठवले, केंद्रीयसामाजिक न्याय राज्यमंत्री

विश्वास नांगरे पाटलाचे आदेश
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून नेर्ले गावात याबाबत प्रत्यक्ष बैठक घेण्यात आली. जर प्रत्यक्ष तक्रार प्राप्त झाली तर कारवाई केली जाईल, असे नांगरे पाटील यांनी सांगितले.