बलून बंधार्‍याचे श्रेय केवळ भाजपचे

0

भडगाव तालुका अध्यक्षांनी पत्रकाद्वारे मांडली भूमिका
भडगाव – गिरणेवरील बलून बंधारे हे फक्त भाजपचेच म्हणजे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, खा. ए. टी पाटील व आमदार उन्मेश पाटील यांचेच श्रेय आहे. बाकी कोणीही याचे श्रेय घेऊ नये, असे भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आ. किशोर पाटील व माजी आ. दिलीप वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक काढले.

काय म्हणाले सोमनाथ पाटील?
पत्रकात म्हटले आहे, जोपर्यंत जुने प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन प्रकल्पाना मान्यता देता येणार नाही, असे आघाडी शासनापासून धोरण होते. त्यामुळे बंधार्‍यांना मान्यता देण्यास अडचणी आल्या. मध्यंतरी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खा ए. टी. पाटील, आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नांतून तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी गिरणा नदिची हवाई पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गिरणा नदिवरील बलून बंधार्‍यांना पायलट प्रोजेक्ट म्हणून मान्यता देऊन शंभर टक्के निधी केंद्र देणार होता. त्यानुसार बलून बंधार्‍यांच्या डीपीआरला तांत्रिक सल्लागार समीतीची मान्यता घेऊन प्रस्ताव केंद्रीय जलआयोगाकडे सादर करण्यात आला. केंद्रीय जलआयोगाने बंधार्‍यांना राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता नसल्याने कारण पुढे करून त्यानुसार राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार उन्मेश पाटील यांनी अधिकार्‍यांसह राज्यपालांची भेट घेऊन खास बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यास परवानगी देण्याबाबत विनंती केली. तर केंद्र यासाठी निधी देणार असल्याने प्रशासकीय मान्यता देण्यास अडचण नसल्याची भूमिका खा ए. टी. पाटील यांनी मुख्यमंत्री फडणीस यांच्याकडे मांडली. मात्र जोपर्यंत एकात्मिक जलकृती आराखडा मंजूर होत नाही तोपर्यंत नवीन प्रकल्पाला मान्यता द्यायची नाही असेही धोरण शासनाचे असल्याने राज्यपालांना परवानगी देता आली नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन गेल्या जून महीन्यात तापी एकात्मिक जलकृती आराखडा मंजुर केला. त्यानुसार गेल्या आठवड्यात प्रशासकीय मान्यता देण्यास परवानगीचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांकडे सादर करण्यात आला होता. त्यास काल राज्यपालांनी मान्यता दिली. आता राज्य शासन लवकरच प्रशासकीय मान्यता देईल व केंद्रीय जल आयोगाकडून बलूनच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल. सुदैवाने केंद्रीय जलसंपदा खाते हे नितीन गडकरी यांच्याकडे असल्याने निधी उपलब्ध होण्यास कुठलीही अडचण नसताना आमदार किशोर पाटील हे बलून भाजपचे गाजर आहे, पण म्हणतात नंतर मी पाठपुरावा करीत असल्याची वल्गना करून दुतर्फा भूमिका मांडतात. तसेच दिलीप वाघ म्हणतात आम्ही पाणी वाटप पत्र दिले. 25 वर्षा पासून प्रलंबित प्रश्न होता तुमच्या आघाडी सरकारने 15 वर्षात फक्त पाणी वाटप पत्रच दिले. वरून म्हणतात की आम्हीच करून दाखवू आजी माजी आमदार द्वयिंना जनता ओळखून आहे. यांनी कधीही बलून संदर्भात पाठपुरावा केला नाही. यांचे दोघांचे सेटलमेंटचे राजकारण चालते व आमचे विकासाचे राजकारण आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनताच यांना यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.