बळसाणे (गणेश जैन)। शेतकर्यांना खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपत आल्याने येणार्या खरीप हंगामाची तयारीला सुरुवात झाली आहे. बळसाणेसह माळमाथा परिसरात शेतकर्यांची खरीप हंगामाची तयारी सुरु आहे. शेतीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळण्याची कायम प्रतीक्षा करीत असलेल्या बळीराजाला सुर्योदय व सुर्यास्त शेताच्या बांधावरच पहावा लागतो आहे. रखरखत्या उन्हात शेतातील कामे उरकण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. पारंपरिक साधनांसह आता शेतीकरिता यंत्रसामग्रीचा वापर केला जात असल्याने श्रमाची बचत होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शेतीमध्ये विविध कामे सुरु
उन्हाळ्याच्या दिवसात खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतर तयार होणार्या पिकांना बचावासाठी व जनावरे पिकाकडे येवू नये म्हणून धुर्यावर कुंपण करण्यासाठी बोरीच्या झाडाच्या काट्या तोडून फास लावणे, शेतीची नांगरणी करणे, शेतातील केरकचरा वेचणे, बांधावरील तण नाहीसे करणे, शेण खत टाकणे आदी कामे शेतकर्यांना अवघ्या दोन महिन्यांत आटोपणे गरजेचे असते. त्यातच लग्नसराई असल्याने त्यात शेतीकामासाठी विलंब होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तापमान दिवसेंदिवस वाढत असले तरी शेतात राबवावेच लागत असल्याने शेतकरी त्याची बैलजोडी घेऊन शेताकडे जातांना दिसत आहे.
रोहिणी नक्षत्राची वाट
अवघ्या काही दिवसावर रोहिणी नक्षत्र आले आहे. उन्ह, वारा, पाऊस या तिन्ही ऋतुत बळीराजाला काम करावेच लागते. नापिक आली, अतिवृष्टित पिक गेले तरी आणि कर्जबाजारी झाले तरी शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. येणारा दिवस हा चांगला उगवेल अशी आशा शेतकर्यांना लागली आहे. बळसाणेसह माळमाथा परिसराचा शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला लागले आहे. शेतीच्या मशागत करण्यासाठी परिसरात वखरणीचे काम सुरु झाले आहे. यानंतर बळीराजाची आस वरुनराजाच्या आगमनाकडे असणार आहे.
कामे अंतिम टप्प्यात
बैलजोडीच्या वाढत्या किंमती पाहता बहुतांश शेतकर्यांजवळ बैलजोडी नाही. याकारणाने उन्हाळवाहीचे कामे ट्रॅक्टरच्या मदतीने केली जात आहेत. नांगरणी, वखरणी, धुरळणी ही कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. यामुळे शेतकर्यांना शेतातील कामे आटोपणे गरजेचे आहे. यासाठी बळसाणेसह माळमाथा परिसरातील शेतकर्यांची धांदल सुरू आहे. शेतीची पोत कायम राखण्यासाठी शेणखताची आवश्यकता असते पण जनावरांची संख्या कमी होत असल्याने बळसाणे व परिसरातील शेतकर्यांना जिल्ह्याबाहेर जाऊन महागडे शेणखत आणावे लागत आहे.
शेती करावी की नाही असे वाटायला लागले आहे. कारण गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून दुष्काळाची झळ सोसत शेतीत काम करावे लागत आहे. खरीप हंगामाच्या तयारीला लागलो असले तरी शेतात वापरण्यासाठी रासायनिक खत, बी-बीयाणे तसेच इतरही मोठा खर्च असून हातात पैसे नसल्याने तारांबळ उडाली आहे.
-जयसिंग गिरासे, शेतकरी,बळसाणे