बळसाणे । साक्री तालुक्यातील बळसाणे येथील बसस्थानक परिसरात बेशिस्त वाहनामुळे प्रवासी बांधवांसह दुकानदारांची गैरसोय होते. महामंडळाच्या बसचालकांना देखील बेशिस्त पणे उभ्या असलेल्या वाहनाच्या दुतर्फातून बस चालकाला बस काढण्यास त्रास होत आहे. याबाबत एसटी बसेसच्या चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा बेशिस्त लावलेल्या वाहनांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने एसटी बसेसच्या चालकासह प्रवासी मात्र त्रस्त झाले आहेत.
वाहतुकीची कोंडी नित्याचीच
या चौकात खाजगी वाहनधारक बेधडकपणे आपली वाहने मिळेल त्या जागेवर लावत असतात. यामुळेच वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने चौकातील दुकानदार देखील वैतागले आहेत. वाहनांचा कर्कश आवाज आणि धुळीमुळे अनेकांची गैरसोय होत आहे. याबाबत निजामपूर पोलिसांनी खाजगी वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे. या जैन तीर्थक्षेत्रात पर्यटकांची नियमित वाहनांची मोठी वर्दळ असते तरी देखील पोलिस प्रशासन बळसाणे तीर्थाबाबतीत दुर्लक्ष करीत आहे.
सरपंचाकडून कारवाईची मागणी
अशा बेशिस्तपणे वाहन लावल्याचे आढळल्यास अशा वाहनचालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे व नंदु धनगर तसेच सुजाण नागरिकांनी केली आहे. या बेशिस्त वाहन पार्कींगमुळ मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. बेशिस्तवाहनधारकांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बळसाणे येथील या बेशिस्तवाहनधारकांच्या त्रासांनी दुकानदार देखील त्रस्त झाले आहेत.
मुख्य चौकात वर्दळ
गावात बसस्थानक नसून ही अवाढव्य चौकात खासगी वाहनांसह मुख्य बाजारपेठ असल्याने चौकात नियमितपणे मोठी वर्दळ असते.अशा गर्दीतून एसटी बसेसच्या चालकाला कुठलाही विलंब न लावता बस लवकर मार्गस्थ करावी लागते. चौकांमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीसह जनसामान्यांची गर्दी वाढत असल्यामुळे अशा गर्दीतून मोठाली वाहने काढणे जिकिरीचे झाले आहे.