‘स्कायमेट’ने वर्तविला मोसमी पावसाचा अंदाज
यंदा देशावर दुष्काळाचे सावट नाही
जून-सप्टेंबरमध्ये 100 टक्के पावसाची शक्यता
हवामान खात्याचा अंदाज पुढील आठवड्यात येणार
नवी दिल्ली : तापमानाचा पारा वाढला असतानाच देशभरातील बळिराजासाठी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मोसमी पावसाचा दिलासादायक अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार, यंदा देशावर दुष्काळाचे सावट नसून, जून ते सप्टेंबर या कालावधीत 100 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. संपूर्ण मोसमात 96 ते 104 टक्के पाऊस होईल, असे दिलासादायक भाकितही या संस्थेने वर्तविले आहे. दुसरीकडे, केंद्रीय हवामान खाते आपला पाऊसमानाचा अंदाज पुढील आठवड्यात वर्तविणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात तापमानवाढीने झाली असून, शेतकरी शेतीमशागतीच्या कामात गुंतलेला असताना स्कायमेटने गूड न्यूज दिल्याने त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 2018 मध्ये नैऋत्य मोसमी वारे सरासरीइतके सक्रीय राहणार असून, जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या मुख्य कालावधीत सरासरी 887 मिलीमीटर पाऊस पडेल, असे स्कायमेटने नमूद केले आहे.
बळिराजासह सर्वांच्या आशा पल्लवित!
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती असल्याने मोसमी पावसाकडे केंद्र व राज्य सरकारे यांच्यासह उद्योग, व्यवसाय आणि शेतकरीवर्गाचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे पाऊसमानविषयक हवामान खात्याच्या अंदाजाकडे सर्वच कान लावून बसलेले आहेत. याच अंदाजावर बाजारपेठेतील आर्थिक चढउतारही अवलंबून असतात. स्कायमेटने सर्वप्रथम अंदाज जाहीर करून भारतीय हवामान खात्याला मागे टाकले आहे. तसेच, हा अंदाज समाधानकारक असल्याने बळिराजाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला असून, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सूरत या शहरात सरासरीइतका पाऊस पडेल, जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. दक्षिण भारत, सीमावर्ती भागात पाऊस सामान्य राहणार असून, मध्य भारतात मात्र चांगल्या पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्यावर्षीदेखील स्कायमेटने वर्तविलेला अंदाज खरा ठरला होता. राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागला नव्हता. यंदाही चार महिन्यात 887 मिलीमीटर पावसाचा अंदाज खरा ठरल्यास शेती, व्यावसाय व व्यापार स्थिरस्थावर राहण्यास मोठी मदत होणार आहे.
असा आहे अंदाज..
0% : यंदा दुष्काळाची शक्यता
05% : जास्त पावसाची शक्यता
20% : सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता
55% : सर्वसाधारण पावसाची शक्यता
20% : सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता
अहवालातील ठळक बाबी
1. यावर्षी देशाच्या कोणत्याही भागात दुष्काळाची शक्यता नाही
2. पाऊसमान चांगले असल्याने शेतकरी सुखी, अर्थव्यवस्था सुदृढ होणार
3. जून-सप्टेंबर कालावधीत 887 मिमी पावसाच्या अंदाजासह 100% पाऊस होणार
4. ला नीना, प्रशांत महासागरात हळूहळू तापमान वाढण्याची शक्यता पाहाता, ओल्या दुष्काळाची शक्यता नाही