नाशिक । मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी काल नाशिकच्या शेतकर्यांनी सरकारच्या दरपत्रकाची होळी केली होती. तसेच जमीन देण्याबाबत जबरदस्ती केल्यास तुमच्या कुटुंबासह स्वत:ला संपवू, अशी धमकी देत आंदोलन छेडलं होतं. आज मात्र इथल्या शेतकर्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. नाशिकच्या शिवडे गावातील ग्रामस्थांनी स्वत:चीच चिता रचून आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे झाडाला दोर बांधून गळफास घेण्याचा इशाराही गावकर्यांनी दिला आहे. समृद्धी महामार्गाला नाशिकमधील शिवडे गावासह एकूण 49 गावांनी विरोध दर्शवला आहे.
शेतकर्यांचा विरोध कायम
सरकारने दरपत्रक जाहीर केल्यानंतरही शिवडे गावातील अनेक शेतकर्यांचा या महामार्गाला विरोध मात्र कायम आहे. आम्हाला 2 कोटी रुपये एकरी दिले तरी आम्ही जमीन सोडणार नाही, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला होता. त्यामुळे शेतकर्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सरकारकडून सुरू आहेत
नाशिकमधील शिवडे गावासह 49 गावांतील गावकर्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. चिता रचतच शिवडे गावात 45 ठिकाणी बांधांवर फासही लटकवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील 49 गावातील शेतकर्यांनी तीव्र विरोध करत लढा उभारला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या इशार्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहेत, असा गंभीर आरोपही नाशिकच्या आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी केला आहे.
आता शेतकर्यांचा संघर्ष जमिनीसाठी
समृध्दी महामार्गाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. शेतकर्यांनी कर्जमाफीनंतर आता जमिनींसाठी आंदोलन पुकारलंय. महामार्ग बनवण्यासाठी शेतकर्यांना त्यांच्या जमिनी सरकारला द्याव्या लागणार आहेत. यासाठी सरकारने दरपत्रकही जाहीर केले आहे. मात्र काही केल्या शेतकरी त्यांच्या जमिनी सरकारला द्यायला तयार नाहीत.
काय आहे प्रकरण?
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकर्यांचा विरोध डावलून मोजणी सुरू केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने जमीन संपादन करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत आहे.