बळीराजा सुखी भव!

0

‘अच्छे दिन’ येतील म्हणून भुलून आम्ही भाजपवाल्यांच्या मागे गेलो. परंतु, प्रत्यक्षात आमच्या वाट्याला कडकडीत ऊनच आले. सरकार जर आमच्या प्रश्‍नांना न्याय देणार नसेल तर ते उलथवून टाकण्याची ताकद चळवळीत आहे, असा सज्जड इशारा देत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा आज राजभवनावर धडकणार आहे, तर जाणते राजे म्हणून बिरुदावली मिळालेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचीही शेतकर्‍यांशी संवादयात्रा चंद्रपुरातून सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार शिवार यात्रेला भिडले आहेत, तर शिवसेनेनेही आपले शिवसंपर्क अभियान राज्यभर राबवले आहे. विरोधी पक्षाच्या संघर्षयात्रेचे टप्पेही पूर्ण झालेत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी भाजप सोडून सर्वांचा आटापिटा सुरू आहे, तर कर्जमाफीने शेतकरी आत्महत्यांचा प्रश्‍न संपणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

याच पार्श्‍वभूमीवर दरवाजावर येऊन ठेपलेला मान्सून सर्वांना सुखद धक्का देतो आहे. राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची अपेक्षा आहे. मान्सूनमुळे बळीराजाच्या आशेला नवी पालवी फुटेल, असे वाटत आहे. आपल्या कृषिप्रधान देशाची बहुतांश अर्थव्यवस्था शेतीउत्पादन आणि त्याला मिळणारा बाजारभाव यावर अवलंबून आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस बरसल्यानंतर यावर्षीही मार्चपासूनच मान्सूनने सुखद धक्के देणे चालू केले. यंदा मान्सून वेळेवर येण्याबरोबर तो सरासरीएवढा असा समाधानकारक बरसेल, असे एकापाठोपाठ एक अंदाज भारतीय कृषी हवामान विभागाकडून आले. या शुभ संदेशात अजून एक भर म्हणजे 26 मे रोजी मान्सून श्रीलंकेत दाखल झाला. तो आज म्हणजे 30 किंवा उद्या 31 मे रोजी भारतीय प्रवेशद्वारावर अर्थात केरळात येऊन धडकणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सर्वसाधारणपणे मान्सून 1 जूनला केरळात दाखल होतो. त्यानंतर 7 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात पोहोचून 15 जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून टाकतो. अशावेळी केरळात एक ते दोन दिवस अगोदरच दाखल होणारी घटनाही महत्त्वाची मानली पाहिजे. कधी नव्हे ते हवामान खात्याचे सर्व अंदाज खरे ठरू लागले आहेत. एकदा मान्सून केरळात दाखल झाला की, तो झपाट्याने पुढे सरकतो. यावर्षी राज्यात वेळेवर पावसाला सुरुवात होईल.

पावसाच्या पहिल्या टप्प्यात समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकर्‍यांसह मार्केटमध्येही चैतन्यमय वातावरण आहे. शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. कृषी उत्पादनातील गुंतवणूकदारांचा बाजारही फुलला आहे. शेतीचे उत्पादन वाढले म्हणजे मोठा ग्राहक वर्ग असलेल्या आपल्या देशाकडे वस्तू आणि सेवांचे मार्केटिंग करण्यासाठी जगाचे लक्ष असते. शेतीतून उत्पादन वाढ साधली गेली, तरी उत्पन्न वाढ साधतेच असे नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पिकांची निवड ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मागील वर्षीचे अनुभव आपल्या पाठीशी आहेत. सोयाबीन तुरीपासून गहू, भुईमुगापर्यंत शेतकर्‍यांनी उत्पादन वाढवूनही त्यांच्या उत्पन्नात वाढ मात्र झाली नाही. यावर्षीही चांगल्या पाऊसमानाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांमध्ये उत्पादनवाढीची खात्री आहे. मात्र, त्याचबरोबर शेतमालाचे भाव पडून अधिक मिळकत न होण्याचा धोका आहे. त्यामुळे यावर्षी शेतमालाची सध्याची उपलब्धता, जागतिक पातळीवरील उत्पादनाचे अंदाज तसेच बहुतांश शेतकर्‍यांचा पिकांकडील ट्रेंड याबाबतीत माहिती घेऊन त्याचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण केल्यास शेतमाल काढणीच्या वेळेच्या दराचा सर्वसाधारण अंदाज बांधायला हवा. शेतकर्‍यांना लुबाडणारे दलाल आणि व्यापारी यांच्या तावडीतून शेतकर्‍यांची सुटका व्हावी आणि त्याला थेट व्यापार करता यावा, अशा वाटा मोकळ्या होणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार बळीराजानेही या खुल्या मार्केटमध्ये स्वतः ट्रेडिंग करण्याचे मार्ग अवगत करायला हवेत.

मान्सूनच्या वेळेवर आगमनामुळे आणि समाधानकारक बरसणे यामुळे अधिक आणि खात्रीशीर उत्पादनाची हमीच मिळाली आहे. असे असले तरी राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पडणार्‍या पावसाच्या प्रमाणात मोठी विविधता आढळून येते. यापुढे पेरण्या करण्यापूर्वीच शेतकर्‍यांनी संपूर्ण नियोजन आखायला हवे. शेतकर्‍यांनी पीक आणि पाण्याच्याही योग्य नियोजनाची आणि व्यवस्थापनाची तयारी ठेवायला हवी. याबाबत पीकनिहाय बाजार विश्‍लेषण तज्ज्ञांचे मार्गदर्शनही घ्यायला हवेे. जागतिकरण आणि उदारीकरणाच्या या युगात कोणत्याही शेतमालाचे केवळ अधिक उत्पादन घेणे पुरेसे नाही तर शेतमालाचे स्मार्टपणे मार्केटिंग करून अधिक नफा पदरात पाडून घेणे गरजेचे आहे. हेच अर्थकारण म्हणजे शेतकर्‍यांचे खरे सक्षमीकरण होय. तसे झाले तर आंदोलने, मोर्चे आणि डोकी फोडून घेण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार नाही. शेतकर्‍यांचे वैयक्तिक अर्थशास्त्र सुधारण्याची गरज आहे, तर तो सुखावेल.