मुंबई : राज्य सरकारच्या वतीनं दिला जाणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर २०१८ चा जीवनगौरव पुरस्कार बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांना दिला जाणार असल्याची असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केली. दरवर्षी राज्य सरकारकडून तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका जेष्ठ कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील दत्तोबा फुलसुंदर, लता पुणेकर, जयमाला इनामदार, प्रकाश खांडगे, विद्याधर जिंतीकर व श्यामल गरुड यांनी सन २०१८ या वर्षीच्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड एकमताने केली आहे. याआधी हा पुरस्कार कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, सुलोचना नलावडे, हरिभाऊ बढे, मंगला बनसोडे, साधू रामा पाटसुते, अंकुश खाडे उर्फ बाळू, प्रभा शिवणेकर , भीमाभाऊ सांगवीकर, गंगारामबुवा कवठेकर, राधाबाई खोडे नाशिककर व मधुकर नेराळे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.