यावल- मामाकडे सुटीनिमित्त आलेल्या चिमुकलीचा एस.टी.बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील कोरपावली बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. रागिनी समाधान मरसाळे (4) असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेने कोरपावली गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा
एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील रहिवासी रागिनी ही आपल्या आईसह कोरपावली येथील मामा किरण संतोष निकाळजे यांच्याकडे केली होती. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या रागिनी ही मैत्रिणीसह खेळत असताना यावल-कोरपावली मार्गे मोहराळे बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.0953) जात असताना बसच्या मागील चाकात सापडल्याने ती जागीच ठार झाली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांची मोठी गर्दी जमा झाली. या प्रकरणी यावल पोलिसात मामा किरण निकाळजे यांच्या फिर्यादीवरून बस चालक शिवाजी पंडित पाटील (बोरोले) विरुद्ध मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नेताजी वंजारी करीत आहेत. दरम्यान, यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर डॉ.फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन केले.