बसण्याच्या जागेवरून महिलांमध्ये राडा

0

कल्याण । लोकलमध्ये सीटच्या वादातून महिलांच्या ग्रुपने एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर उतरल्यानंतर रेल्वे पोलीस ठाणे गाठत या अज्ञात महिलांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. तासभराच्या लोकल प्रवासात बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी अनेक महिला दिवा, डोंबिवली ठाकुर्ली, कोपर स्थानकातून डाऊन करतात. यामुळे अनेकदा कल्याण स्थानकातून प्रवास करणार्‍या महिलांना हक्काची सीट मिळत नसल्यामुळे या महिलामध्ये बाचाबाची आणि हाणामारी होत असल्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली असून सीटच्या वादातून एका महिलांच्या ग्रुपने एका महिलेला बेदम मारहाण केली आहे.

रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा
कल्याणहून सीएसटीकडे जाणार्‍या लोकलच्या दुसर्‍या वर्गाच्या डब्यातून प्रवास करणार्‍या डोंबिवलीतील चारुमती वेल्हाळ या महिलेने डोंबिवली स्थानकातून डाऊन कल्याण लोकलने कल्याणपयर्र्त प्रवास केला. कल्याणात फलाट क्रमांक 5 वर थांबलेल्या लोकलमध्ये चढलेल्या महिलांनी वेल्हाळ यांना सीट रिकामी करण्यासाठी दमदाटी केली.

आपल्याला सीएसएमटीला जायचे असल्यामुळे आपण जागा सोडणार नसल्याचे त्यांनी सांगताच या ग्रुप मधील संतापलेल्या 5 ते 6 महिलांनी वेल्हाळ यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले त्यांना नखांनी ओरबाडले. कामावर पोहचण्याची घाई असल्याने वेल्हाळ यांनी या महिलांच्या शिव्या खात मुंबईपर्यत प्रवास केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर उतरल्या नंतर मात्र वेल्हाळ यांनी इतर सहकार्‍याच्या मदतीने थेट रेल्वे पोलीस ठाणे गाठत या अज्ञात महिलांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.