बसपा संकटात… असंतुष्टांची आघाडी…

0

लखनौ: बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना पाठिंबा देणारे १६ दलित, मुस्लिम आणि ओबीसींचे गट मायावतींची कोंडी करण्यासाठी एकत्र आले आहेत. या गटांचे नेतृत्व एकेकाळी बसपाचे असलेले पण लागोपाठच्या निवडणूक पराजयांमुळे बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेले नेते करीत आहेत. नुकतीच या असंतुष्टांनी बैठक घेऊन योजना आखली आहे. मायावतींच्या राज्यसभेतील नाट्यमय राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशातील दलित राजकारणाचे गतीशास्त्र बदलले असल्याचे संकेत मिळत आहेत.

मायावतींच्या बसपाविरोधात बहुजन अलायन्स
इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सनुसार अंसतुष्ट नेत्यांनी नॅशनल बहुजन अलायन्स अँड कोऑर्डिनेशन नावाची आघाडी स्थापन केली आहे. बसपाचे माजी खासदार प्रमोद कुरील यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समितीही बनविण्यात आली आहे. आघाडीचे प्रमुख उद्दीष्ट उत्तर प्रदेशातील दलितांसाठी बसपव्यतिरिक्त अन्य पर्याय निर्माण करणे हे आहे. आघाडीत इंडियन नॅशनल लिग, बहुजन संघर्ष पार्टी, बामसेफनिगडित संघटना आदींचा सहभाग आहे. मायावतींच्या जातव जातीसाठीही त्या मसिहा राहिलेल्या नाहीत, असे आघाडीचे म्हणणे आहे.

मायावतींविरोधात पुढाकार घेणारे कोण….
नसिमुद्दीन सिद्दीकी हा बसपाचा मुस्लिम चेहरा होता. ते मायावतींचे अत्यंत जवळचे होते. मे २०१७ मध्ये त्यांची भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मायावतींनी हाकालपट्टी केली. त्यांनी राष्ट्रीय बहुजन समाज पक्ष स्थापन केला. आतापर्यंत ते राजकारणापासून अलिप्त होते पण त्यांनी सर्वांना एकत्र आणले आहे. सिद्दीकी यांनी मायावतींवर दलित चळवळ संपविल्याचा आरोप केला आहे. पक्षाबाहेर पडलेल्या अनेक नेत्यांनी मायावती पैसे मागतात असे आरोपही केले आहेत.

बसपा संख्याबळ कमी, सत्तेची पोकळी
बसपाचे राज्यसभेत पाच खासदार आहेत. लोकसभेत एकही खासदार नाही आणि उत्तर प्रदेश विधानसभेत केवळ १९ आमदार आहेत. बसपाचे लोकसभागृहांमधील संख्याबळ कमी झाल्यामुळे सत्तापोकळी निर्माण झाली आहे. नेमकी ही वेळ बसपातून परागंदा झालेल्या दिग्गजांनी साधली आहे. सिद्दीकींच्या हाकालपट्टीनंतर इंद्रजित सरोज यांना तडाखा मिळाला. त्यानंतर बसपाचे अलाहाबाद व कोशंबीचे ३० नेते पक्षाबाहेर गेले. त्यात बसापा मंत्री हिरामणी पटेल, माजी आमदार असीफ जाफरीही होते.