बसमध्ये चढतांना चोरट्याने महिलेची पर्स लांबविली

0

जळगाव। पुणे-यावल बसमध्ये चढत असतांना यावल येथील महिलेची 12 हजार रुपये किंमतीचे दागिने ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना नवीन बसस्थानक येथे मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. पर्स चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलेने रिक्षेतून जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठत संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी जिल्हा पेठ पोलिसांनी नवीन बसस्थानकावर जावून घटनास्थळाची पाहणी केली होती. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले.

पुणे-यावल बसमध्ये चढतांना घडली घटना
ज्योती अशोक पाटील (वय-34 रा. मुपो.नावरे, पोस्ट-विरावली ता. यावल) ह्या बारावर्षीय मुलगा ऋतीक याच्यासोबत मंगळवारी सकाळी भाऊ संभाजी अंकुश पाटील यांना भेटण्यासाठी पारोळा गेल्या होत्या. भावाची भेट घेतल्यानंतर सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास त्या मुलासोबत यावल जाण्यासाठी पारोळा येथून बसमध्ये बसल्या. यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास जळगावातील नवीन बसस्थानकावर उरतल्यानंतर पुन्हा यावल जाण्यासाठी ज्योती पाटील ह्या पुणे-यावल याबसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढतांना प्रवाश्यांची गर्दी झाल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने ज्योती पाटील यांच्या मोठ्या पर्समध्ये ठेवलेली दागिने ठेवलेली लहान पर्स चोरून नेली.

दागिने ठेवलेली रिकामी डबी सापडली
बस यावलसाठी रवाना झाल्यानंतर शहरातील शिवाजी नगरपुलाजवळ आल्यानंतर महिलेने तिकिट काढण्यासाठी मोठ्या पर्समधील लहान पर्समध्ये पैसे काढण्यासाठी हात टाकल्यानंतर लहान पर्सं दिसून आली नाही. त्यातील सहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टाप्स तसेच सहा हजार रुपये किंमतीचे कानातील साकळी गायब झालेले दिसून आले. यानंतर ज्योती पाटील यांनी शिवाजीनगरात बस थांबविली आणि थेट रिक्षात बसून नवीन बसस्थानक गाठले. ज्या ठिकाणी त्या बसल्या होत्या तेथे जावून प्रवाश्यांना विचारपूस केल्यानंतर प्रवाश्यांनी त्यांना कंट्रोल ऑफीसात जाण्याचा सल्ला दिला. कंट्रोल कार्यालयात गेल्यानंतर एका कर्मचार्‍यास त्यांनी विचारपूस केल्यानंतर कर्मचार्‍यांने त्यांचा पासपोर्ट फोटो व दागिने ठेवलेली रिकामी डबी त्यांना दाखवताच ज्योती पाटील यांनी ती ओळखी. अखेर दागिने चोरी झाल्याचे त्यांना खात्री झाली.

पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी
ज्योती पाटील यांनी लागलीच दुपारी मुलासोबत जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यानंतर ज्योती पाटील यांच्या फिर्यादीवरून 6 हजार रुपये किंमतीचे टाप्स, तसेच 6 हजार रुपये किंमतीच्या कानातल्या साखळ्या अशा 12 हजार रुपये किंमतीचे ऐवज चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवीन बसस्थानक येथे पर्स तसेच मोबाईल लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहेत. भुरट्या चोरट्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता प्रवाश्यांकडून होत आहे.