बसवेश्‍वर चौकातील सीसीटीव्हीमुळे चोरी उघड

0

धुळे । सामाजिक संवेदना जपत, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंडोरे परिवारातील प्रमुख असलेल्या मनपा स्थायी समितीच्या सभापती वालिबेन मंडोरे आणि चेतन मंडोरे यांनी शहरातील संत बसवेश्‍वर चौकात स्वखर्चाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा फायदा पोलीस तपासात झाल्याचे उघड झाले आहे. बारापत्थर परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून अगदी अलीकडेच पोलिसांनी 28 लाखांची चोरी उघडकीस आणली आहे.

कर्मचार्‍याकडून केली होती लुट
जळगावच्या अंगडीया कंपनीच्या कर्मचार्‍याचे अपहरण करुन मुंबईच्या भामट्यांनी 28 लाखांची लुट केली होती. या भामट्यांमध्ये एक गँगस्टर होता तर दुसरा पोलिस दलातील कर्मचारी होता. या लुटीच्या घटनेचा तपास करतांना असंख्य दिव्यातून पोलिसांना जावे लागले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आरोपींपर्यंत कानुन के लंबे हाथ पोहचण्यामध्ये बारापत्थर परिसरातील संत बसवेश्‍वर चौकातील सीसीटीव्हींची मदत झाली आहे. अक्षयतृर्तीयेच्या दिवशी संत बसवेश्‍वर महाराज नाम फलकाची विटंबना काही समाजकंटकांनी करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक संवेदना जपणार्‍या चेतन मंडोरे आणि स्थायीच्या सभापती वालीबेन मंडोरे यांनी स्वखर्चाने त्याच दिवशी या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी हे सीसीटीव्ही बसविण्यात आले. त्यानंतर सुदैवाने अशी घटना घडली नाही. मात्र 28 लाखांच्या लुटीतील आरोपी मिळायला या सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मदतच झाली. सामाजिक संवेदना जपणार्‍या धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी पुढाकार घेवून धुळे शहरातील चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर चोरी, घरफोडीच्या घटना तसेच इतर गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. धुळे शहर गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होईल अशी जनभावना आहे.