नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान पामबीच मार्गे एनएमएमटीची बससेवा सुरू करण्याची लेखी मागणी भाजपा नवी मुंबई महासचिव सतीश निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. महापालिका प्रशासनाचे मुख्यालय बेलापुर किल्ले गावठाण चौकात असून जवळपास कोणतेही रेल्वे स्थानक नाही. त्यामुळे महापालिका मुख्यालयात येणार्या एनएमएमटीच्या बसेसचा अथवा सिवूड्स, बेलापुर रेल्वे स्थानकापासून रिक्षांसेवेचा आधार घ्यावा लागतो.
ऐरोली ते वाशी यादरम्यानच्या नवी मुंबईकरांची पालिका मुख्यालयाकडे सध्या होत असलेली येण्या-जाण्याची गैरसोय दूर करण्याकरता महापालिका प्रशासनानेच पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे सतीश निकम यांनी निवेदनात म्हटले आहे. नवी मुंबईकरांची महापालिका मुख्यालयात होत असलेली गैरसोय लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शक्य तितक्या लवकर वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालय व्हाया पामबीच मार्गे सुरू करावी अशी मागणी भाजपा नवी मुंबई महासचिव सतीश निकम यांनी केली आहे.