बसस्थानकच बनले वाहनतळ!

0

येरवडा । जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे आजोळ तसेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या लोहगाव भागातील बसस्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या ठिकाणी बसस्थानकाचे अनधिकृत वाहनतळ बनल्याने प्रवाशासह बसचालकांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.

बसस्थानकालगतच लोहगाव पोलिसचौकी
मुख्य चौकातच बसस्थानक असल्याने व येथूनच धानोरी, निरगुडी, वडगाव शिंदे, वाघोली आदी भागाला मार्ग जात असल्यामुळे वाहनांची वर्दळ ही नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. त्यातच बसस्थानकालगतच लोहगाव पोलीस चौकी असल्याने अनेक कामानिमित्त परिसरातील नागरिक चौकीमध्ये येत असतात. मात्र परिसरात वाहनतळच नसल्याने अनेक चारचाकी व दुचाकीस्वार हे स्वतःचे वाहन हे रस्त्यातच लावत असल्याने याचा नाहक त्रास इतर वाहनचालकांना करण्याची वेळ येत आहे.

उपाययोजना करण्यास असमर्थ
अनधिकृत वाहनतळासह अनेक पथारी व्यावसायिकांना रस्त्यावर बेकायदेशीरपणे कब्जा करून व्यवसाय थाटल्याने पादचार्‍यांनादेखील याचा मनस्ताप सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर बस वळविताना ती कशापद्धतीने वळवावी? हा प्रश्‍न चालकांना सतावत आहे. यामुळे बसस्थानकावर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची नेहमीच झालेली धांदल पाहायला मिळते. बसस्थानकालगतच पोलिस चौकी असूनही पोलिस अधिकारी, कर्मचारी व महापालिका प्रशासन यावर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरले आहेत. चौकातून जाताना एखाद्या वाहनचालकास बसचा थोडासा जरी धक्का लागला, तरी अनेकांना अनेकदा बाचाबाचीला सामोरे जावे लागत आहे. त्यांना या दहशतीचा सामना करण्याची वेळ नेहमीच येत असल्यामुळे याविरोधात कोणी आवाज उठवत नाही.

प्रवाशांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ
बसेस उभ्या करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना बस लांबच उभी करण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण इतर वाहनांबरोबरच अवैध वाहतुकीचे जाळेदेखील येथे पसरल्याने बस उभ्या करायच्या कुठे? हा प्रश्‍न सतावत आहे. यावर बस डेपो काही उपाययोजना का करत नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. कारण बसशेड असतानादेखील अनधिकृत पार्कींगमुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ येत आहे. तरी अनधिकृत वाहनतळावर कारवाई केल्यास बसस्थानक मोकळा श्‍वास घेईल असा विश्‍वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व भागांत बसेची व्यवस्था
येरवडा, वडगाव शेरी, खराडी, विश्रांतवाडी या उपनगरांसह लोहगाव या भागात खासगी महाविद्यालयांचे पसरलेले जाळे, आंतराष्ट्रीय असलेले लोहगाव विमानतळ या मुख्य विकासकामांमुळे या भागात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करून उभारलेल्या टोलेजंग इमारतींमुळे राज्यासह परराज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाल्याने लोकसंख्येत देखील अधिक भर पडल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामगारवर्गाची मुख्य गरज लक्षात घेऊन पीएमपीएमएलच्या वतीने शहरातील सर्व भागांत या ठिकाणाहून बसेस सोडण्यात येत असल्या तरीही परिसरातील प्रवाशांना समस्या जाणवते ती येथील अनधिकृत वाहनतळाची!