जळगाव । शहरातील नवीन बसस्थानकातील कॅन्टीनजवळील स्लॅबचा काही भाग मंगळवारी दुपारी 2 वाजता अचानक कोसळल्याने गोकुळ आत्माराम बाविस्कर (वय-34 रा.मोहाडी,ता.जामनेर) हा प्रवासी जखमी झाला आहे. दरम्यान, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने एसटी कर्मचार्यांनी लागलीच प्रवाश्यास उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मोहाडी येथील गोकुळ बाविस्कर हे शेतकरी असून ते मंगळवारी सकाळी जळगावातील ओम हॉस्पीटल येथे उपचारासाठी आले होते. उपचार घेऊन घरी परतण्यासाठी ते नवीन बसस्थानकावर आले. यावेळी ऊन लागत असल्याने ते बसस्थानकातील कॅन्टीनजवळ सावलीत उभे होते. दुपारी 2 वाजता मात्र अचानक कॅन्टीनजवळील स्लॅबचा काही भाग त्यांच्या डोक्यावर कोसळला. स्लॅब डोक्यावर पडताच त्यांना जबर दुखापत होवून रक्तस्त्राव सुरू झाला. हे एसटी कर्मचारी निलीमा बागुल, बाळासाहेब पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत. बाविस्कर यांना रिक्षात बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. बाविस्कर यांच्या हाताला व डोक्याला मार बसला आहे. यानंतर सायंकाळी बाविस्कर यांना खाजगी रूग्णालयात हलवविण्यात आले.