बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची बोंब

0

साक्री । तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या साक्री बस स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाश्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. साक्री बसस्थानकावरून नवापूर, धुळे, नंदुरबार, नाशिक या लांब पल्ल्याच्या बसमधील प्रवशांना पिण्याच्या पाण्यासाठी बसस्थानक परिसारातील हॉटेलमध्ये पाणी पाऊच, पाण्याची बॉटल विकत घ्यावे लागत असते. सध्या कडक उन्हाळा असल्याने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा बस स्थानकात उपलब्ध करून देण्याचे आगर प्रमुखांचे कर्तव्य असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पाणपोई उपलब्ध करून देण्याची मागणी
पिण्याच्या पाण्याची सोय सुलभ शौचालयाजवळ करण्यात आली आहे. यातच तेथे पाणी नसल्याने प्रवाशांना धावपळ करावी लागत आहे. बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाणी असून या ठिकाणी तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांना रोज ये-जा करावी लागते. बसस्थानकात एनक वर्षांपासून काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाणपोई उभारण्यात येत होती. यावर्षी बसस्थानकात पाणपोई लावण्यात आली नसल्याने पिण्याच्या पाण्याची सुविधा बस आगार प्रमुखांनी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. बसस्थानकात प्रवाशांनी बसच्या चौकशीसंदर्भांत संपर्क साधला असता त्यांना कंट्रोल रूममधील दूरध्वनी कायम व्यस्त असल्याची रेकॉर्ड ऐकविण्यात येत असते. यातच सप्तश्रृंगी देवीची यात्रा असल्याने सप्तश्रृंगीगडावर जाणार्‍या प्रवाशांच्या संख्या लक्षणिय आहे.या प्रवेशांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने तासन तास बसुन रहावे लागत असून या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.