बसस्थानकावर टारगटांचा त्रास

0

सावदा । येथील बसस्थानकात दारुडे आणि टारगट मुलांचा उपद्रव वाढल्याने महिला प्रवासी प्रचंड भीतीखाली आहेत. रात्री वाजेनंतर महिला प्रवाशांना पाहून अश्लील संभाषण, मोबाइलवर गाणी वाजवणे, असे उपद्व्याप करून छेडखानीदेखील केली जाते. परिवहन महामंडळ आणि पोलिसांना या प्रकाराशी जणू काहीही देणे-घेणे नाही.

मालमत्तेचे केले जाते नुकसान
सुमारे नऊ वर्षांपूर्वी नवीन बांधकाम करून सावदा बसस्थानक चकचकीत करण्यात आले. प्रकाश व्यवस्थेसाठी एलईडी दिवे, सुरक्षेसाठी पोलिस चौकी तयार करण्यात आली. मात्र, रात्री वाजेनंतर टारगट मुले, दारुड्यांच्या उपद्रवामुळे एकही प्रवासी या बसस्थानकात जाण्यास धजावत नाही. विशेषत: महिला प्रवाशांसमोर जाऊन अश्लील भाषेत बोलणे, मोबाइलवर गाणी वाजवणे, प्रसंगी आवारात मद्यपान करणे, असे प्रकार चालतात. याविषयी एखाद्या प्रवाशाने हटकले असता, हुज्जत घातली जाते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही. एवढ्यावरच दारुडे थांबत नाहीत. तर बसस्थानकातील मालमत्तेचे नुकसानदेखील केले जाते. मार्बल, एलईडी दिव्यांचेदेखील उपद्रवींनी नुकसान करून ठेवले आहे. राजरोसपणे होणार्‍या या प्रकारांना अटकाव बसवण्यासाठी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.

अनाधिकृत फेरीवाल्यांची चांदी
सावदा रेल्वे स्थानकावर दोन फलाट आहेत. या दोन्ही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नळ असले तरी तेथे पाण्याचा मात्र पत्ता नाही. पाण्याच्या शोधासाठी प्रवासी इतरत्र गेल्यास गाडी सुटण्याचा धोका असतो. याचा गैरफायदा तेथील अनधिकृत फेरीवाले घेतात. प्रवाशांना ज्यादा भावाने पिण्याचे पाणी वा तत्सम थंड पदार्थांची चढ्या भावाने विक्री होते. त्यामुळे व्यक्त होणारी नाराजी पाहता रेल्वे प्रशासनाने सावदा स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.

पाण्यासाठी भटकंती
राज्य मार्गावरील महत्त्वाचे शहर असल्याने सावद्यात अनेकांची ये-जा असते. यापैकी बहुतेक प्रवासी बसने ये-जा करतात. मात्र, सावदा बसस्थानकात या प्रवाशांची कोणतीही सोय नाही. महिला पुरुषांसाठीची प्रसाधनगृहे बंदावस्थेत असून त्यांची दुरावस्था झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई-दिल्ली मार्गावरील सावदा हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. येथील मालधक्क्याहून संपूर्ण भारतभर केळी निर्यात केली जाते. येथे दररोज दोन पॅसेंजर एक एक्स्प्रेस गाडी थांबते. शिवाय अनेकवेळा लांबपल्ल्याच्या गाड्यांना तांत्रिक कारणांमुळे थांबा मिळतो. मात्र, सावदा स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने या गाड्यांमधील शेकडो प्रवाशांचे हाल होतात.