इंदापूर । इंदापूर-बारामती पालखी राज्य मार्ग क्रमांक 66 वरील निमगाव केतकी ते भवानीनगर या मार्गातील एसटी महामंडळाच्या बस स्थानकांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही बसस्थानके आता शेवटच्या घटका मोजू लागली आहेत. निवडणूक काळात विकासाचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी मात्र, एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यात वेळ घालवत असल्याने राजकीय जुगलंबी इंदापूरात पाहायला मिळत आहे.
…म्हणून भरणे यांना मिळाला कौल
राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मागील 20 वर्षे इंदापुर तालुक्यात घराणेशाहीच्या जोरावर व बहुमताच्या आधारावर राज्याच्या मंत्रीमंडळामधे विविध खात्यांचे मंत्री पद भूषविले. या काळात जवळचे नातेवाईक, पदाधिकारी मोठे करण्यात त्यांचा अधिक वेळ गेला. त्यामुळे तालुक्याच्या विकासाकडे लक्ष देण्याची सवडच त्यांना मिळाली नाही. तरीही सतत 20 वर्षे इंदापूर तालुक्यातील जनता ठामपणे हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी उभी राहीली. तालुक्यातील शेतकर्यांच्या आर्थिक विकासाचा कणा समजला जाणारा हर्षवर्धन पाटील दूध संघ डबघाईला येऊन बंद पडला आणि शेतकर्यांच्या आर्थिक विकासाच्या नाड्या बंद पडू लागल्या. परिणामी मतदारांमध्ये नाराजी पसरली. त्याचे पडसाद 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उमटले. मतदारांनी दत्तात्रय भरणे यांना कौल देत आमदार म्हणून निवडून दिले.
बसस्थानके आली मोडकळीस
20 वर्षाच्या काळात हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा केल्याने इंदापूर बारामती पालखी राज्य मार्ग क्रमांक 66 वरील निमगाव केतकी ते भवानीनगर या मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसस्थानके मोडकळीस आली आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास मागील अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे. प्रवाशांना भर रस्त्यात ताटकळत एसटीची वाट बघावी लागत आहे. त्यामुळे ऊन, पावसाच्या दिवसात त्यांची मोठी गैरसोय होते. मतदारांनी हर्षवर्धन पाटील यांना डावलून दत्तात्रय भरणे यांना आमदार म्हणून निवडून दिले. सर्वसामान्यांना विकासाच्या बाबतीत त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु मागील तीन वर्षात भरणे यांनी तालुक्यात म्हणावा तसा विकास केला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
…तर तालुक्याच्या विकासाचे काय?
इंदापूर-बारामती राज्य पालखी मार्गावरील बेलवाडी, लासुर्णे, अंथुर्णे, शेळगाव, गोतोंडी, निमगाव केतकी येथील बस स्थानकांची अवस्था अतिशय बिकट व केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आमदार भरणे यांच्या गावातील बसस्थानकाची अशी स्थिती असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गावात ही स्थिती तर तालुक्याच्या विकासाचे काय? असा उपरोधीक चर्चेचा सूर तालुक्यात अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत असल्याने आमदार भरणे यांच्या कर्तुत्वावर लोक प्रश्न चिन्ह उपस्थित करू लागले आहेत. लोकप्रतिनिधी विकासापेक्षा एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यात आघाडीवर आहेत.
बस स्थानकांची दुरुस्ती कधी?
डबघाईला आलेली बसस्थनके हा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय असून विरोधकांनाही या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने या बस स्थानकांची दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. आजी माजी लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बस स्थानकांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याच्या दुरुस्तीबाबत हालचाली करतील का? याचे उत्तर येणार्या काळात आपल्याला पाहायला मिळेल.