भुसावळ । तुटलेली बाके, गुटखा, पान खावून थुंकल्याने रंगलेल्या भिंती, सर्वत्र साचलेले पाण्याचे तळे व पडलेले खड्डे, कुठेही उभ्या राहणार्या बसेस व अनधिकृत विक्रेत्यांनी मांडलेला ठिय्या असे विदारक चित्र शहराच्या बसस्थानकात निर्माण झाले आहे. पावसामुळे बसस्थानक आवाराची प्रचंड दुरवस्था झाल्यानंतर प्रशासन हालचाल करीत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे.
खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त
जंक्शन रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या व हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या बसस्थानकाची अवस्था अत्यंत विदारक आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न दरमहा स्थानिक आगाराला मिळत असताना प्रवाशांसाठी मात्र कुठल्याही सोयी-सुविधा नाही वा त्या पुरवण्याबाबत कुठलेही सौजन्यही दाखवले जात नाही. बसस्थानक आवारात एक-एक फुटाचे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने बस आल्यानंतर गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते व खड्डे बुजण्यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाहीत.
अवैध विक्रेत्यांचा बसस्थानकाला विळखा
बसस्थानकात अनधिकृत विक्रेत्यांचा शिरकाव वाढला आहे. बसस्थानकाच्या मध्यभागीच या विक्रेत्यांनी डेरा टाकल्याने प्रवाशांना त्यामुळे मोठाच मनस्ताप सोसावा लागत आहे. किती विक्रेत्यांना बसस्थानकात खाद्यपदार्थ विकण्याची मुभा आहे वा नाही याबाबत स्थानिक पातळीवर कुठलीही माहिती नाही. काही व्यावसायिकांना हॉटेल्ससह अन्य व्यवसाय करण्याची मुभा असलीतरी अनधिकृत विक्रेत्यांनी मात्र बसस्थानकात डेरा टाकल्याने या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
प्रवासी त्रस्त, प्रशासन सुस्त
हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी बाके असलीतरी काही तुटलेली आहेत शिवाय बसस्थानकाच्या भिंती पान खावून पिचकार्यांनी रंगवण्यात आल्या आहेत. बसस्थानक स्वच्छतेसंदर्भात स्थानिक आगार प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मातांसाठी हिरकणी कक्ष असलातरी त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून येते. बसस्थानकात दिवसभर भिकार्यांसह उपद्रवींचा वावर असतो. पोलीस प्रशासन मात्र बघ्याची अवैध विक्रेत्यांचा बसस्थानकाला विळखा भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
अवैध वाहतुकीची डोकेदुखी
बसस्थानकाला अवैध वाहनधारकांनी विळखा घातला आहे. बसस्थानकातून प्रवाशांची सर्रास पळवापळवी होत असल्याने आगाराच्या उत्पन्नावर परीणाम झाला आहे. दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
बसस्थानकाच्या दुरवस्थेसंदर्भात विधानसभेत औचित्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. संबंधित विभागाशी चर्चा करून समस्या सोडवण्याबाबत निश्चित प्रयत्न करू.
-संजय सावकारे, आमदार, भुसावळ
बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात 15 दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकार्यांकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. बसस्थानकातील सम स्या सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू.
-एम.एम.भोई, आगार व्यवस्थापक