वाहतूक ठप्प ; यावल आगारप्रमुखांसह पोलिसांनी घेतली धाव
यावल- तालुक्यातील कोळन्हावी येथे शनिवारी सकाळी गावातून बाहेर शिक्षणार्थ जाणार्या विद्यार्थी आणि नागरीकांनी गावातून बस येत नाही म्हणुन रास्तारोको केला.तर पोलिस प्रशासन आणि यावल आगाराचे व्यवस्थापकांच्या आश्वासनाने एक तासानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. कोळन्हावी गावातील बहुसंख्य विद्यार्थी डांभूर्णीसह जळगाव येथे शिक्षण घेतात. यात मुलांसह मुलींची संख्या मोठी आहे. गेल्या दिड दोन महीन्यांपासून यावल व चोपडा आगारातील बसेस ह्या कोळन्हावी गावातून येत नसल्याने विद्यार्थ्यांची तारेवर कसरत सुरू आहे. बससेवा सुरू न झाल्याने शनिवार, 5 रोजी सकाळी सात ते नऊ पर्यंत रस्ता अडवत वाहने अडवण्यात आली. यात विद्यार्थ्यांसह गावकरीही सहभागी झाले. या प्रकाराची माहिती कळताच यावल तालुका आगाराचे प्रमुख एस.व्ही.भालेराव यांनी भेट देऊन चोपडा आगाराशी संपर्क साधून बससेवा गावातून सुरळीत केली. या प्रसंगी यावलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे, सुशील घुगे, संजय देवरे, सुनील तायडे आदींनी मध्यस्थी केली. रास्ता रोको आंदोलनात शिवसेना युवाध्यक्ष गोटू सोळंके, जगदीश सोळंके, गोपाळ सोळंके, आण्णा साळुंके, अरुणा साळुंके, पोलिस पाटल कैलास साळुंके, समाधान साळुंके संतोष साळुंके व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.