पुणे । शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारणे आणि स्वच्छतेसाठी महापालिकेने मोबाइल टॉयलेट उभारण्यासाठी पीएमपीच्या बंद पडलेल्या 100 बसेसमध्ये स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यांतर्गत पहिल्या टप्प्यात महापालिकेने 13 बंद बसेस घेतल्या होत्या. मात्र, त्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. बंद पडलेल्या पीएमपी बसेसमध्ये स्वच्छतागृहे करण्याचे काम महापालिकेने ‘सीएसआर’अंतर्गत केले असले, तरी या बसेस ‘अॅपेसेट प्राईस’ म्हणून पीएमपीने तब्बल 25 लाख 33 हजार रुपयांची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
भंगारात जाणार्या बसेसची पुन्हा खरेदी
शहरात वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची संख्या कमी असल्याने महापालिकेने पीएमपीच्या बंद पडलेल्या बसेसमध्ये स्वच्छतागृहे तयार करून ती शहरात आवश्यकता असलेल्या ठिकाणी उभी करण्याचा निर्णय घेतला. त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीने सुमारे 13 बसेस महापालिकेस दिल्या होत्या. मात्र, आता पीएमपी प्रशासनाकडून त्या बसेसचे शुल्क मागण्यात आले आहे. ही रक्कम सुमारे 25 लाख 33 हजार रुपयांची आहे. पूर्व पीएमटी आणि तत्कालीन पीएमपीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने बस खरेदी केली असून त्यासाठी नागरिकांचेच पैसे वापरले आहेत. असे असताना पुन्हा भंगारात जाणार्या बसेसही महापालिकाच यानिमित्ताने खरेदी करणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.