मुक्ताईनगर । राज्य परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर आगाराची बर्हाणपूर-मलकापूर ही बस उलटून त्यात पाच जण जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर शहराच्या बाहेरील स्मशान भूमिजवळ घडली होती. त्यामुळे यातील जखमींना राष्ट्रीय परिवहन महामंडळातर्फे आर्थिक मदत करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची मुक्ताईनगर आगाराची बर्हाणपूर-मलकापूर ही बस बर्हाणपूरहून येवून मलकापूर येथे मुक्कामास असते.
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालविले
बस क्रमांक एमएच 14 बीटी 2700 या बसमध्ये जखमी झालेले प्रवासी ईश्वरलाल देवलाल जैसवाल (रा. शेलापूर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बर्हाणपूर-मलकापूर या बसचे चालक हे बस चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलत होते. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविले व सदर बस उलटली. बसच्या अपघातास प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभुत ठरल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सलमाबी मोईनुद्दीन शहा (रुदाणा), ईश्वरलाल देवलाल जैसवाल (रा. शेलापूर), देविदास पुंजाजी इंगळे (रा. घुस्सर), पंढरी रुपचंद कवरे (रा. भाटगणी, ता. मलकापूर), विनोद चावदस सुरवाडे (रा. पळासखेडे) असे पाच जण जखमी झाले असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंपी करीत आहे. दरम्यान, यातील जखमींना प्रत्येकी पाचशे रुपयांची राष्ट्रीय परिवहन महामंडळातर्फे आगार व्यवस्थापक डी.एम. वाणी, वाहतूक नियंत्रक वाय.व्ही. सावळे, लिपीक आकाश जयकर यांनी स्वतः मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात जावून जखमी प्रवाशांना तात्काळ आर्थिक मदत दिली.