बस चालकाला युवकाकडून बेदम मारहाण

0

भडगाव पोलीसात मात्र चालकावरच गुन्हा दाखलचा प्रकार

कजगाव – येथील बस स्थानकावर एका महिलेने बस आणि प्रवाशांना वेठीस धरून बस थांबवून ठेवली होती. चालकाने तुम्ही मागील बसने या असे सांगितले असता, महिलेच्या मुलाने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार आज सकाळी ८ वाजता घडला. या घटनेत उलटपक्षी चालकावरच भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम राजकीय दबावातुन करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बस स्थानकावर चाळीसगाव- पारोळा बस उभी असताना एका महिलेने बस मध्ये बसण्याऐवजी बस रोखून ठेवली माझा मुलगा घरी गेला आहे व तो येईपर्यंत बस येथून पुढे नेऊ नका असे वाहकाला सांगून बस व प्रवाशांना देखील वेठीस धरले. त्या महिलेस वाहक व चालकाने समजवून, तुम्ही मागील बसने या असे सांगितले. यावेळी महिलेचा मुलगा त्याठिकाणी आला व त्याने चालकाला शिवीगाळ आणि मारठोक करण्यला सुरवात केली. हाकेच्या अंतरावर पोलीस केंद्र असतांनाही चालकाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. दरम्यान प्रवाशांनी मारहाण करणार्‍या युवकाच्या तावडीतुन चालकाला सोडविले. मारहाणीत चालक जखमी झाल्याने त्यास कजगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यता आले. मात्र पुढील उपचारासाठी भडगाव ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी उपचार घेऊन चालक भडगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता उलटपक्षी चालकावरच कलम ३५४ चा गुन्हा दाखल होत आहे असे पोलिसांनी सांगितले. बस चालकाचा कुठलाही दोष नसताना केवळ राजकीय दबावापोटी भडगाव पोलिसांनी बस चालकास असे सांगितले. मात्र बस चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार मारहाण करणार्‍याविरूध्द केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर मारहाण करणार्‍यांना सोडून देण्यात आले. खोट्या गुन्ह्याच्या भीतीपोटी बस चालकास आपला घरचा रस्ता शोधावा लागला. या प्रकाराची भडगाव तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती. तसेच राजकीय दबाव टाकणारे ‘ते’ लोकप्रतिनीधी कोण? असा प्रश्‍नही यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.