बस चालक जाकीर पठाण यांचे प्रसंगावधान अन् मोठा अनर्थ टळला

जळगाव- बस स्थानकावरून नऊ वाजेच्या सुमारास जळगाव पाचोरा बस क्रमांक एमएच १४ बीटी २१७८ स्वातंत्र चौकात अचानक ब्रेक फेल झाले. अशा परिस्थीतीत चालक जाकीर पठाण यांनी प्रसंगावधान राखत गिअरच्या सहाय्याने वेगात असलेल्या बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमधील प्रवाशांनी चालक जाकीर पठाण यांचे आभार व्यक्त केले.
शहरातील बस स्थानकातून निघालेल्या बस क्रमांक एमएच १४ बीटी २१७८  हीचे स्वातंत्र्य चौकात अचानकपणे ब्रेक फेल झाले. या बसच्या समोर एक ऑटो रिक्षा व कार देखिल समोरून येत होती. अशा वेळी बस चालक जाकीर पठाण यांनी प्रसंगावधान ओळखुन गिअरच्या सहाय्याने बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी चालक जाकीर पठाण यांचे तोंडभरून कौतुक केले.
अधिकार्‍यांकडून असहकार्य
चालक जाकीर पठाण यांनी घटनेची सर्व माहिती संबंधित अधिकार्‍यांना दिली. तदनंतर जळगाव आगारातील मेकॅनिकल यांनी तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा केली. ही बस पूर्ण सुधारणा करण्यासाठी जळगाव आगारात आणत असताना पुन्हा ब्रेक फेल झाल्याने गोंधळ निर्माण झाला. चालकाची मनस्थिती खराब झाल्यामुळे जळगाव आगाराच्या कर्मचार्‍यांनी बस चालवत आणली. त्यानंतर पठाण यांनी पाचोरा आगार व्यवस्थापक नीलिमा बागुल यांना पुनश्च संपूर्ण माहिती दिली. परंतु त्यांनी देखील यथोचित सहकार्य केले नसल्याचे श्री पठाण यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे श्री पठाण यांची प्रकृती खराब झाली असल्याने त्यांनी उपचार करण्यासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.