जळगाव। रामदेव वाडी ते शिरसोली दरम्यान दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महिला गंभीर जखमी होवून रस्त्यावर पडून होती. भावाने रस्त्यावरून ये-जा करणार्यांना मदतीची हाक मारली परंतू कोणीही मदतीसाठी आला नाही. अखेर लोक मदत करत नसल्याचे पाहून बस चालक व वाहकाने गाडी थांबवून रूग्णवाहिकेला पाचारण करण्यासाठी संपर्क साधले. यानंतर त्या रस्त्यावरून जाणार्या आरोग्य निरीक्षकांची चारचाकी जात असतांना त्यांनी जखमी महिला दिसल्यानंतर त्यांनी चारचाकी थांबवत महिलेला चारचाकीत बसवून रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. महिलेसाठी धावून आलेले बसचालक, वाहक तसेच आरोग्य निरीक्षक यांनी आजही माणूसकी अजून जिवंत असल्याचे दाखवून दिले.
महिलेच्या चेहर्याला दुखापत
म्हसावद येथील रहिवासी भिका रघुनाथ पाटील हे आज रविवारी सकाळी 6.30 वाजता महिण लता लक्ष्मण चौधरी यांना सोबत घेवून दुचाकी क्रं. एमएच.19.5546 ने जळगावात उपचारार्थ दाखल असलेल्या भावाला डबा देण्यासाठी येत होते. रामदेववाडी ते शिरसोली दरम्यान हॉटेल लयभारी जवळ लताबाईंचा तोल जाऊन त्या कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या तोंडाला मार बसल्याने तोंडातुन रक्त येवू लागले. यानंतर बहिण जखमी झाल्याचे दिसताच भिका यांनी रस्त्यावर मदतीसाठी ये-जा करणार्या गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु कोणी सहकार्य करत नव्हते.
जळगाव ते बांबरूड बस (क्र . एमएच 20 बीएल 1596) वरील चालक बाळू हटकर व वाहक गोपाळ पाटील यांना रस्त्यात जखमी अवस्थेत महिला दिसल्यानंतर त्यांनी बस थांबवून भिका पाटील यांना मदतीचा हात धाकविला. त्यांनी तात्काळ प्रथमोपचार सुरू करुन रुग्णवाहीकेसाठी 108 क्रमांकारवर संपर्क साधला. रुग्णवाहीका पोहचण्यास 20 मिनीटांचा कालावधी लागणार असल्याने त्यांनी अनेक वाहनांना हात देवून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु माणूकी संपलेले वाहनचालक गाडी थांबविण्यास तयारच नव्हते. याच वेळी पाचोरा न.पा.चे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील हे चारचाकी (क्र. एमएच 19 एपी 4639) ने जळगावहून पाचोरा जात असतांना कुणी विनंती करण्या आधिच त्यांनी रुग्णाला रुग्णालयात नेण्याची तयारी दाखवली.
अन् रूग्णवाहिका घटनास्थळी
एस.टी.कर्मचार्यांच्या व इतरांच्या सहाय्याने जखमी महिलेस कारमध्ये वसविले व तीच्या भावास धीर दिला. परंतु शासकिय रुग्णवाहिका व जैन समूहाची रुग्णवाहिका काही मिनिटातच त्या ठिकाणी आल्यानंतर या महिलेस रुग्णालयात पाठविण्यात आले. एस.टी.चालक व वाहकांचा प्रथमोपचार, कारचालक पाटील यांनी जखमीस रुग्णालयात नेण्याची स्वत:हून दर्शवलेली तयारी व वेळेवर पोहचलेली रुग्णवाहिका यामुळे लता चौधरी यांना जिवदान मिळाले आहे. या घटना घडत असतांना काही लोक मात्र रस्त्याच्याकडेला उभे राहून गंमत पाहण्यात धन्यता मानत होते. यामुळे काही लोकांची माणूकी जागृत आहे तर काही लोकांची माणूसकी संपली असल्याचे दिसून येेते.