बस न थांबल्याने तीघांकडून बसचालकास बेदम मारहाण

0

एस.टी.कर्मचाऱ्‍यांचे तीन तास काम बंद आंदोलन

एरंडोल – बस थांब्याजवळ रिक्षा उभी असल्यामुळे बस थोड्या अंतरावर थांबवली याचा राग आल्यामुळे तीन जणांनी बस चालकास शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या एस.टी.कर्मचाऱ्‍यांनी सुमारे तीन तास काम बंद आंदोलन केले. मारहाण करणाऱ्‍यांविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भुमिका कर्मचाऱ्‍यांनी घेतल्यामुळे ग्रामीण भागातील बस सेवा सुमारे तीन तास ठप्प झाली होती. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्‍यांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे बस सेवा पूर्ववत सुरु झाली.

बसमध्ये घुसुन शिवीगाळ करून केली मारहाण
बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एरंडोल आगाराची बस क्रमांक (एमएच २० बीएल २३९९) भडगाव कडून एरंडोल येथे येत होती. खडकेसिम येथील बस थांब्याजवळ रस्त्याच्या कडेलाच एक रिक्षा उभी असल्यामुळे बस चालक शे.अतिक शे.अनिस (वय-३९) रा.सितारामभाई बिर्ला नगर एरंडोल यांनी बस पुढे थांबवली. बस थांब्यावर बस थांबवली नाही म्हणुन खडकेसिम येथील मंगलसिंग नंदलाल पाटील व अन्य दोन जणांनी चालक शे.अतिक शे.अनिस यास बसमध्ये घुसुन शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण झाल्याचे चालकाने बस आगारामधील सहकारी कर्मचाऱ्‍यांना सांगितल्यानंतर कर्मचारी संतप्त झाले. 11.30 वाजेच्या सुमारास कर्मचारी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे कर्मचारी अधिकच संतप्त झाले व त्यांनी जोपर्यंत तक्रार दाखल करून संशयितांविरोधात गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरु केले.

दोन जणांविरोधात पोलीसात गुन्हा
सुमारे तीन तासानंतर संशयितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.दरम्यान चालक शेख अतिक शे.अनिस यांना मुका मार लागल्यामुळे त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगार प्रमुख विजय पाटील व एस.टी.कर्मचा-यांनी चालक शेख यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.सुमारे तीन तास एस.टी.कर्मचाऱ्‍यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना बस स्थानकावर ताटकळत थांबावे लागले. याबाबत बसचालक शे.अतिक शे.अनिस यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगलसिंग नंदलाल पाटील व अन्य दोन जणांनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे तपास करीत आहे.