बस पास दरवाढीविरोधी सह्यांची मोहीम सुरूच राहणार

0

पुणे । पीएमपी प्रवासी मंच व पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील 11 संस्थांनी पीएमपीएमएल बस पास दरवाढ व ‘पंचिंग’ (एक मार्ग) पास रद्द करण्याबाबत हाती घेतलेली सह्यांची मोहीम आणखी काही दिवस सुरू ठेवली जाणार आहे. त्याचप्रमाणे यापुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून दरवाढीचा निषेध केला जाणार आहे.

गेल्या महिन्याभरापासून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील संस्थांनी पीएमपी बस दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहिम सुरू केली. त्यात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. सुमारे 15 हजार नारिकांनी सह्या करून दरवाढीला विरोध केला. त्यानंतर लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी दरवाढी संदर्भातील प्रवाश्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी प्रवासी मंच व सजग नागरिक मंचातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. परंतु, त्यामुळे दरवाढीविरोधातील लढा न थांबवता लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करून तो तीव्र केला जाणार आहे.

सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, की जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पीएमपी दरवाढीबाबत भूमिका घेतली नाही. त्यांनी यात लक्ष दिले असते तर दरवाढ झाली नसती. त्यामुळे या पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. तसेच पुढील आंदोलनबाबत येत्या मंगळवारी (दि.5) होणार्‍या प्रवासी मंचाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.