बस भरावावर चढल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प

0

पोलादपूर । मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आजवर झालेले काम पावसाळा सुरू झाल्यानंतर धोकादायक असल्याचे उघड झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील पार्ले गावातील शेलार ढाब्यासमोरील वळणावर सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस कलंडल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली, तर या अपघातामध्ये पाच प्रवासी जखमी झाले.

सावंतवाडी ते कुडाळ लक्झरी बस (एमएच 08 के 4741) घेऊन निघाला असता सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही बस राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा असलेल्या मातीच्या कच्चा भरावापैकी शेलार ढाब्याजवळील भरावावर चढल्यामुळे महामार्गावर कलंडून मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. या अपघाताची खबर गणेश जिवाजी नारकर (42, सिध्दार्थनगर, साईनिवास, बांद्रा) या प्रवाशाने जखमी अवस्थेत पोलादपूर पोलीसांना दिली. यावेळी पोलादपूरचे उपनिरिक्षक अनिल अंधेरे आणि सहकारी तातडीने अपघातस्थळी रवाना झाले. यावेळी दोन्ही कच्च्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मूळच्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही लक्झरी बस आडवी पडल्याने दोन्ही बाजुंची वाहतूक बंद झाली. या अपघातात गणेश जिवाजी नारकर यांच्यासह त्याची पत्नी पुजा गणेश नारकर, अनंत शंकर गुरव(48,संगमेश्‍वर, सध्या नालासोपारा) तन्वी अनंत गुरव (09) आणि सुहासिनी राधाकृष्ण माळवदे (60,सावंतवाडी) हे पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने पावसाच्या सरी येत असल्याने या लक्झरी बसच्या खिडक्या बंद असल्याने कोणीही प्रवासी गाडीतून बाहेर फेकले गेले नाहीत.

परिस्थिती धोकादायक झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येते
या अपघातानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांची कोंडी होऊन संपूर्ण लक्झरी बस पूर्ववत् उभी करेपर्यंत अडीच तास हा वाहतुकीचा खोळंबा प्रवासी वर्गाला सोसावा लागला. याप्रकरणी पोलीस नाईक पी.एस.मोरे हे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.पोलादपूर तालुक्यासह मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात सर्वत्रच रस्त्याची परिस्थिती संबंधित ठेकेदारांनी धोकादायक केली असून, त्यामुळे घडणार्‍या अपघातांना वाहनचालकांवर दोष व गुन्हा दाखल केला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, वीर ते कशेडीपर्यंतचा ठेका मिळालेल्या लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो कंपनीने पावसाळ्यापूर्वीच कामाचा उरक प्रचंड वेगाने केला असला तरी या गतिमानतेमध्ये संभाव्य गैरसोयी आणि धोक्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने रस्त्याची परिस्थिती धोकादायक झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.