बस वाहकांसह चालक व वकीलांना कोरोना लसीकरणात द्यावे प्राधान्य
जिल्हा आरोग्य विभागाकडे शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांची मागणी
भुसावळ : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे कोरोना लसीकरण भुसावळ शहरात सुरू आहे परंतु लसीकरण केंद्रावर पोहचल्यानंतर तेथील गर्दीमुळे एक ते दोन तास सर्वांना ताटकळत बसावे लागत आहे. अशात नागरीकांच्या दररोज संपर्कात येणारे बस वाहक, चालक आणि वकील यांना लसीकरणाच्या केंद्रात प्राधान्य द्यावे, अशी मागणी जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी केली आहे.
तर कोरोना येणार नियंत्रणात
न्यायालयात आता हळूहळू गर्दी वाढू लागली आहे, वकिलांचा थेट संबंध नागरीकांशी येतोय म्हणून वकिलांचे लसीकरण झाले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. विभागात 500 पेक्षा जास्त वकील आहेत. त्यांच्यासाठी प्राधान्याने लसीकरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काही वकिलांनी शिवसेनेकडे केली होती. भुसावळ विभागात राज्य परीवहन महामंडळाचे 300 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. यात बस वाहक आणि चालक प्रवाश्यांना घेऊन जातात व त्यांच्यात जास्त वेळ वास्तव करतात. चालक वाहकांचा जास्तीत जास्त संपर्क नागरीकांशी येत असल्याने त्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांचे लसीकरण झाले का? कर्मचार्यांना काही अडचणी येत आहेत का? याबाबत शिवसेनेतर्फे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी राज्य परीवहन विभागाचे आगार प्रमुख पी.बी.पाटील यांच्याशी चर्चा केली होती. भुसावळात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. बस वाहक, चालक आणि वकील हे आज महत्वाचे घटक आहेत, त्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य दिल्यास कोरोनावर आळा नक्की बसेल म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेणार असल्याचे बर्हाटे यांनी कळविले आहे.