बहरीन । बहरीन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत फेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने विजेतेपद मिळविले. या विजेतेपदासोबत चॅम्पियनशिप रेसमध्ये जवळच्या प्रतिस्पर्ध्यांवर 7 गुणांची आघाडी घेतली. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने दुसरे तर त्याचाच संघसहकारी व्हाल्टेरी बोटासने तिसरे स्थान मिळविले. हॅमिल्टनला या शर्यतीत टाईम पेनल्टीला सामोरे जावे लागले. बोटासने कारकिर्दीत पहिल्यांदाच पोल पोझिशनवरून सुरुवात केली आणि तिसरे स्थान मिळविले.
मोसमातील दुसरे जेतेपद
व्हेटेलचे हे या मोसमातील दुसरे जेतेपद असून याआधी त्याने या मोसमातील पहिली ऑस्टेलियन ग्रां प्रि शर्यत जिंकली होती. मागील आठवडयात चायनीज ग्रां प्रि शर्यत जिंकणाऱया हॅमिल्टनला ही शर्यत पूर्ण करण्यासाठी व्हेटेलपेक्षा 6.6 सेकंद जास्ती घेतले. व्हेटेलचे हे कारकिर्दीतील 44 वे अजिंक्मयपद असून त्याचे आता 68 गुण झाले आहेत तर दुसऱया स्थानावरील हॅमिल्टनने 61 गुण मिळविले आहेत. हॅमिल्टनला 5 सेकंदाचा दंडही सोसावा लागला. पिट लेनमध्ये प्रवेश करताना त्याने अनावश्यकपणे संथ ड्रायव्हिंग करीत बोटासचे अंतर हेतुपूर्वक वाढविण्याचा प्रयत्न केला. याबद्दल त्याला हा दंड करण्यात आला. त्याबद्दल त्याने नंतर चाहत्यांची माफीही मागितली.
रेनॉला पहिल्यांदाच गुण
फेरारीच्या किमी रायकोनेनने चौथे, रेड बुलच्या डॅनियल रिकार्डोने पाचवे, विल्यम्सच्या फेलिप मासाने सहावे स्थान मिळविले. फोर्स इंडियाच्या सर्जिओ पेरेझने सातवे, हासच्या रोमेन ग्रोस्जाँने आठवे स्थान मिळविले. फोर्स इंडिया सलग 13 व्या शर्यतीत गुण मिळविण्यात यश मिळविले. रेनॉच्या निके हुल्केनबर्गने नववे व फोर्स इंडियाच्या नवोदित एस्टेबन ओकॉने दहावे स्थान मिळवित शेवटचा गुण घेतला. रेनॉला या वर्षात पहिल्यांदाच गुण मिळविता
आले आहे.