अमळनेर : अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने बहादरपूर येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत झालेल्या अपहार प्रकरणी सचिवाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या खटल्याचा तब्बल 30 वर्षांनी निकाल लागला. राजेंद्र हरीश्चंद्र वाणी असे शिक्षा सुनावलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.
अपहार प्रकरणी दाखल होता गुन्हा
बहादरपूर येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत भोलाणे तांडा येथील चरणसिंग गोविंदा जाधव हे चेअरमन तर राजेंद्र हरीश्चंद्र वाणी हे सचिव होते. सन 1988 ते 1992च्या कालावधीत झालेल्या लेखा परीक्षणात चेअरमन आणि सचिवांनी 20 हजार रुपयांचा अपहार करून यासोबत स्टॉक रजिस्टर प्रमाणे विविध प्रकारचे खते, बियाणे साठा शिल्लक असताना 14 हजार 882 रुपयांच्या मालाची परस्पर विल्हेवाट लावलेली दिसून आली होती. या अनुषंगाने, अपर लेखा परीक्षक शांताराम नथ्थू पाटील यांनी पारोळा पोलिसांत सन 1993 मध्ये 34 हजार 882 रुपयांचा अपहारप्रकरणी चरणसिंग जाधव व राजेंद्र वाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी प्रदीर्घ काळ सुनावणी झाली. यानंतर शुक्रवारी न्यायाधीश पी.आर.चौधरी यांनी संस्थेचे तत्कालीन सचिव राजेंद्र वाणी यांना सहा महिन्यांचा सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा शिक्षा सुनावली आहे. अर्थात, 34 हजारांच्या अपहार प्रकरणी सुमारे 30 वर्षांनी त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.