फैजपूरात शोभायात्रेतील देखाव्यांनी वेधले लक्ष : खान्देशातील सण-उत्सवांच्या देखाव्यांनी मिळवली दाद
फैजपूर- बहिणाबाई चौधरी यांनी जीवनाचे तत्वज्ञान सोप्या-सरळ आणि ओघवत्या भाषेत सांगून सामान्यांच्या मनातील व्यथा, भावना, आनंद आणि उमेद काव्य रूपाने समाजासमोर मांडले. आज विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मला आधुनिक शिकलेल्या बहिणाबाई भासतात, असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी येथे व्यक्त केले. तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या पुढाकाराने कवयित्री बहिणाबाई चौधरी जीवनदर्शन चित्ररथ शोभायात्रेचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी 12 वाजता आठवडे बाजारात कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्याच्या महिना पूर्तीनिम्मित आयोजित भव्य शोभा यात्रा माजी आमदार तथा तापी परीरसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बहिणाबाईंच्या नावामुळे विद्यापीठाची ग्रामीण भागाशी जुळशी नाळ
याप्रसंगी कुलगुरू पी.पी.पाटील पुढे म्हणाले की, विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव मिळाल्याने या विद्यापीठची नाळ ग्रामीण भागाशी जुळणार आहे. या नावामुळे विद्यापीठामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. 28 वर्षांपासून विद्यापीठने ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देवून आपले वेगळेपण जपले आहे. दरम्यान, शोभा यात्रेची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी व कै. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये कै.लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली.
बहिणाबाईला जीवनाचे तत्वज्ञान कळाले -शिरीष चौधरी
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बहिणाबाईच्या कवितांचा उल्लेख करीत माझी माय सरस्वती होती मले शिकवते बोली, ह्या काव्यपंक्ती गाऊन बहिणाबाईला जीवनाचे तत्वज्ञान कळाले होते, असे सांगितले. या भागातील महिलांचा या पुढील काळात समान विकास होईल, अशी आशा व्यक्त करून या परीसरातील शाळा, महाविद्यालयाच्या माध्यमातून स्त्रियांना बरोबरीचा दर्जा देखील मिळेल, अशी ग्वाही दिली. आज हिंदी दिनाच्या औचित्याने कै.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी हिंदी भाषा, प्रचार आणि प्रसार समिती, वर्धाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठे योगदान दिले असून बाळासाहेबांची आज प्रकर्षाने आठवण येत असल्याचे नमूद केले. आभार शोभायात्रेचे समन्वयक डॉ.गोपाळ कोल्हे यांनी मानले. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य प्रा.दिलीप रामू पाटील, विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य, प्रा.नितीन बारी, सिनेट सदस्य डॉ.अनिल पाटील, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, शरद महाजन, विश्वनाथ भागवत चौधरी, फैजपूर नगरपरीषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, तापी परीसर विद्या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शोभायात्रेने जिंकली शहरवासीयांची मने
सुभाष चौकातून माजी आमदार शिरीष चौधरी , कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील व उपस्थित मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी जीवनदर्शन चित्ररूप शोभायात्रेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ही शोभायात्रा-खुशाल भाऊ रोड-पहेडवाडा- जुने म्युनिसीपल हायस्कुल, न्हावी रोड, रथ गल्ली, लक्कड पेठ, मोठा मारोती मंदिरमार्गे मार्गक्रमण करीत परत सुभाष चौक येथे आली. शोभायात्रेत विद्यार्थांनी बहिणाबाई चौधरी यांची कविता असे संसार संसार आधी हाताले चटके, अरे खोप्या मंदी खोपा, देवा घरोट घरोट, अश्या अनेक कविता म्हणत विद्यार्थ्यांनी लेझीम, वारकरी दिंडीतून येग येग विठाबाई असे अभंग म्हटले. भुलाबाईच्या टिपर्या खेळतांना विद्यार्थिनी आनंदाने नाचत होत्या. 1936 च्या काँग्रेसच्या ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूरला झाल्याने त्याची प्रतिकृती म्हणून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अब्दुल कलाम आझाद, साने गुरुजी, धनाजी नाना चौधरी यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी फैजपूरकरांची मने जिंकली.
ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत
कवयित्री बहिणाबाई चित्ररूप शोभायात्रेला धनाजी सेट रेस्टॉरंट, अक्षदा क्लॉथ कलेक्शन, शुभम क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी नागरी सहकारी पथसंस्था, बाळापुरे ज्वेलर्स, डॉ.उमेश चौधरी, नितीन नेमाडे, तुकाराम बोरोले शिवनेरी गणेशोत्सव मंडळ, भारंबे वाडा, विठ्ठल मंदिर, रथगल्ली दुरुगोत्सव मित्र मंडळ, शिवशक्ती दुरुगोत्सव मित्र मंडळ, होले वाडा नुतन गणेश मंडळ, वंदनीय गणेश मंडळ लक्कड पेठ ,कालिका देवी मंदिर, श्री दत्त डेअरी आदींनी विद्यार्थ्यांना पाणी शरबत, बिस्कीटाची व्यवस्था करून दिली. गावातील महिलांनी रस्त्यावर भव्य रांगोळ्या काढून तसेच पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे जंगी स्वागत केले.
यांनी घेतले परीश्रम
या शोभायात्रेत कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी, कै.लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालय, शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालय, डी.फॉर्म.महाविद्यालयातील सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षककेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. यशस्वी आयोजनासाठी तापी परीसर मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए आय.भंगाळे, डॉ.उदय जगताप, डॉ.आर.एल.चौधरी, प्रा.ए.जी.सरोदे, प्रा.डी.बी.तायडे, समन्वयक डॉ.गोपाळ कोल्हे यांनी प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.