बहिणाबाईंच्या असोद्यातील घराला स्मारकाचा दर्जा देणार

0

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची बहिणाबाई महोत्सवात घोषणा

भुसावळ- कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांच्या असोदा येथील जुन्या घराची खरेदी करून या घराला पर्यटन विभाग स्मारकाचा दर्जा देणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी येथे केली. पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्ह्यातील असोदा येथील बहिणाबाईंच्या घराबाबत काहीतरी करायला हवे, अशी सूचना मांडली होती. पर्यटन विभाग डीपीआर तयार करून घर मालकाडून हे घर खरेदी करेल व त्यानंतर घराची डागडूजी करून पर्यटनाच्या दृष्टीने बहिणाबाईंचे स्मारक साकारले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. बहिणाबाईंचे घराचे स्मारक करायची की त्यांच्या सासरवाड्याच्या विकास करायचा याबाबत आधी निश्‍चिती करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी प्रसंगी केली. पर्यटन विभाग स्वतंत्र डीपीआर तयार करून असोद्यातील घर मालकाकडून घराची खरेदी करणार असून नंतर त्याचा विकास करणार आहे.

अंगणवाडी सेविकांचा प्रश्‍न मार्गी लावणार -पंकजा मुंडे
महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे माजी मंत्री खडसे यांनी काही अंगणवाडी सेविकांना मानधन मिळत नसल्याची तक्रार केली होती तर मनोगतात हाच धागा पकडत अंगणवाडी सेविकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन पंकजा यांनी देत नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी आदेश द्यावेत आम्ही ते पाळू, असे त्या म्हणाल्या. भाषण सुरू असतानाच आशा वर्करांनी उभे राहून समस्या मांडल्या असता त्यांनी मंत्री दीपक सावंत यांना भेटून तुमच्याही समस्या मार्गी लावण्याचे मी वचन देते, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.