जळगाव । गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी या कार्यक्रमात येत आहे. या महोत्सवाला दरवर्षी वाढत प्रतिसाद बघून आनंद होत आहे. अशा सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमास शासन नेहमी मदतीसाठी उभे आहेच सोबत या कामांसाठी आजही अनेक लोक पाठीशी खंबिरपणे पाठींबा देत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळून त्या स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकल्या. त्यांना रोजगार मिळाला म्हणून पैसे मिळाले, आणि पैसे मिळाले म्हणजे तीला घरात किंमत मिळली. त्यामुळे महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यास मोठया प्रमाणात मदत होत असल्याने या बचतगटांच्या वस्तुंची ग्रामीण भागात विक्री वाढावी व या वस्तुंचे प्रदर्शन करता यावे. यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव तयार करावा, अशा सुचना महसुल मंत्री तथा पालक मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केले.
पाठीमागे राहून लढ म्हणा – गौरी सावंत
पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार सोहळात सत्काराला उत्तर देताना मुंबईतील गौरी सांवत यांनी सांगितले की, लहानपणी शाळेत जात असतांना या माऊलीचे आपण गाणे ऐकत होतो. ते गाणे गात होतो अशा बहिणाबाई चौधरी यांच्या कर्मभूमीत येवून त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळत असल्याने मोठी गौरवाची बाब आहे. गेल्या चौदा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना मला अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींना समोरे गेले त्यातून मला यश मिळाले. मात्र या जगात, समाजात वावरत असतांना आपल्यासारख्या काही महिला देह विक्रीच्या व्यवसायात विनाकारण ढकलल्या गेल्या आहे त्यांना मदतीसाठी ’आजीचे घर‘ उपक्रमाच्या माध्यमातून गरजू व पिडीत महिलांना आश्रय देवून त्यांना मदत करित आहे. या उपक्रमांस आम्हाला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहेच पण आम्हाला पाठीमागे उभे राहून फक्त लढ जरी म्हटले तर आम्हाला या कामाची उभारी येणार आहे असे सांगितले.
महोत्सवात यांची होती उपस्थिती
सागरपार्क या मैदानावर भरारी फाऊंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवाचे व बहिणाबाई पुरस्कार प्रदान सोहळा महसुलमंत्री तथा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, पिपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, आमदार राजूमामा भोळे, आमदार स्मिताताई वाघ, विनायक पारख, महापौर ललित कोल्हे, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांची उपस्थिती होती. प्रास्तविक भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशा फाऊंडेशनचे गिरीष कुलकर्णी यांनी केले तर आभार मुग्धा कुलकर्णी यांनी मानले.
चौथ्या वर्षाला उत्तम प्रतिसाद
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात मागील वर्षाच्या महोत्सवात खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसात 88 लाखांची उलाढाल झाली होती. गेल्या चार वर्षापासून सुरू असलेल्या या बहिणाबाई महोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी यांनी सांगितले. त्यामुळे पाहिल्यावर्षी 160 बचत गटाच्या महिलांचा स्टॉल होता, दुसर्यावर्षी 180, तिसर्यावर्षी 200 आणि यावर्षी तब्बल 240 बचत गटाच्या महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
नागरीकांना खान्देशातील संस्कृतीचे दर्शन होणार
यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजात सकारात्मक वातावरण तयार होत आहे. या वातावरणामुळे समाजात चांगले उपक्रम घडत आहे. चांगल्या उपक्रमांना आर्थिक पाठबळही चांगल्याप्रकारे उपलब्ध होत असल्याने या उपक्रमांतून समाजहिताचे काम अधिक जोमाने होण्यास मदत होईल. भरारी फाऊंडेशन गेल्या चार वर्षापासून महिला बचतगटांसाठी राबवित असलेला हा महोत्सव याच चांगल्या उपक्रमाचा भाग असल्याचे गौरोवोद्गारही पालकमंत्र्यांनी यावेळी काढले. खान्देशातील सर्वात मोठा महोत्सव असलेल्या बहिणाबाई महोत्सवात नागरीकांना खान्देशातील संस्कृतीचे दर्शन होणार असून स्थानिक व नामवंत कलाकारांच्या कलेचा आनंद घेता येणार आहे. हा महोत्सव 11 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.