कुलगुरुंचा निर्णय, सीएचबी प्राध्यापकांची होती नियुक्ती?
जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने लोकल इन्स्पेक्शन समिती (एलआयसी) दौर्यांना सुरुवात होण्यापूर्वीच ब्रेक लावला असून, यामुळे सिनेट व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रात एलआयसीला महत्त्व आहे. महाविद्यालयात शैक्षणिक सुविधा, प्रशासकीय कामकाज यांची पाहणी करून त्या संबंधित अहवाल प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचे काम ही समिती करते. हा अहवाल नकारात्मक असल्यास प्राचार्यांची चौकशी होऊ शकते अथवा प्रशासक बसवला जाऊ शकतो. नवीन अभ्यासक्रम सुरू करायचा असेल तर त्याच्या प्रक्रियेत एलआयसीचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरत असतो.
काही दिवसांपूर्वी एलआयसीमधील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे महाविद्यालयांमधील पाहणी दौरे सुरू होणार होते पण त्यापूर्वीच समितीच्या दौर्यांना ब्रेक लावण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयामुळे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे. येत्या 19 मार्चपासून विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे समितीमधील सदस्यांना परीक्षेच्या कामकाजाला प्राधान्य द्यावे लागेल. या शिवाय समितीला आपल्या दौर्याचे नियोजन करण्यापूर्वी महाविद्यालयांना कळवावे लागते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तासिका तत्वावरील काही जणांची नियुक्ती एलआयसीमध्ये झाली होती. प्रत्यक्षात तासिका तत्वावरील प्राध्यापकांना सदस्य म्हणून नियुक्ती देता नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने एलआयसीचे दौर थांबविले असल्याची चर्चा विद्यापीठात वर्तुळात आहे. दरम्यान, या संदर्भात प्र कुलगुरू पी. पी. माहुलीकर यांच्याशी संपर्क साधला असता, कुलगुरुंच्या आदेशानुसार हे दौरे थांबविण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरु पी.पी.पाटील यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.