बहिणीच्या खात्यातून भावांनी लांबवली पाच लाखांची रक्कम : जळगाव शहरातील घटना

Siblings Withdrew Cash Of Five Lakhs From The Sister’s Bank Account  जळगाव : बहिण-भावाच्या पवित्र नात्यानंतरही भावंडांनीच बहिणीच्या खात्यातून पाच लाखांची रोकड परस्पर काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मेहमुद शमसोद्दीन पिंजारी (52), अशपाक शमसोद्दीन पिंजारी (42, दोन्ही रा. शिरसोली) असे गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही भावांची नावे आहेत.

आधी केली रोकडची खातरजमा
शबनम शेख जाकीर पिंजारी या शिरसोली येथील रहिवासी असून त्यांचे पती इंजिनिअर आहेत. कामानिमित्त ते 2012 ते 2021 पर्यंत सौदी अरेबिया येथे होते. शबनम शेख या सुध्दा 2012 ते 2018 पर्यंत तेथे राहत होत्या. त्या अधून-मधून शिरसोली येथे गावी येत होत्या. गावी आल्यावर पैशांची आवश्यकता भासल्यास एटीएमद्वारे पैसे काढून घेत होत्या. त्यावेळी त्यांचे दोन्ही भाऊ अशपाक व मेहुमद हे सोबत येत होते. 24 जुलै 2017 रोजी शबनम शेख या घराची चावी मोठा भाऊ अशपाक याला देऊन पुन्हा सौदी अरेबियासाठी निघून गेल्या. 25 ऑक्टोंबर 2017 रोजी शबनम यांच्या पतीने त्यांच्या बँक खात्यात पाच लाखांचा भरणा केला. तो भरणा झाला आहे की नाही तपासण्यासाठी त्यांनी पत्नीचा भाऊ अशपाक याला बँकेत जाण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी अशपाक याने रक्कम जमा झाल्याचे कळविले.

एटीएमद्वारे लांबवली पाच लाखांची रक्कम
त्यानंतर अशपाक व मेहमुद याने बहिणीच्या घराच्या कपाटातून एटीएम काढून त्याद्वारे बँकेतील पाच लाखाांची रक्कम परस्पर काढून घेतली. 26 सप्टेंबर 2018 रोजी शबनम या पुन्हा गावी परतल्या. त्यावेळी त्यांना दोन्ही भावांनी परस्पर विनापरवानगी रक्कम काढून घेतल्याचे कळाले. त्यांनी ती रक्कम परत करण्याचे सांगितले मात्र रक्कम परत न केल्याने दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.