चाकण: एक महिन्यापूर्वी शिंदे गावातील टेमगिरेवस्तीवर झालेल्या 17 वर्षीय मुलीच्या खून प्रकरणी पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( एलसीबी ) पोलीस पथकाने शोध लावून मयत मुलीच्या भावाला अटक केली असून आरोपीला 5 ऑगस्ट पर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन बालाजी वाघमारे ( वय 19, रा. मोहननगर, मारुती मंदिराशेजारी, चिंचवड, सध्या रा. शिंदेगाव, टेमगिरेवस्ती, ता.खेड, जि. पुणे, मुळगाव चाकूर, लक्ष्मीनगर, लातूर ) यास एलसीबी पथकाने अटक केली. आरोपीला खेड कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
असा घडली होती घटना
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेड तालुक्यातील शिंदे गावातील टेमगिरे वस्तीवरील 17 वर्षाच्या तरुण मुलीचा कुर्हाडीने अंगावर व डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. शीतल बालाजी वाघमारे ( सध्या राहणार शिंदे, टेमगिरे वस्ती, तालुका खेड, जिल्हा पुणे, मुळगाव चाकूर, लक्ष्मीनगर, जिल्हा लातूर ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. रविवार दि. 25 जून रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शीतल ही शौचाला गेली होती. घरापासून 300 फुटावर ही घटना घडली. शितलचे वडील दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आसपासच्या परिसरात शोध घेताना लगतच्या माळरानावरील एका नाल्याजवळ शीतलच्या मृतदेह आढळला. तिचे वडील बालाजी वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीने दिली कबुली
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. माने, उपनिरीक्षक एम.बी. मोरे, सहाय्यक फौजदार एस.के. बादल, पोलीस हवालदार डी.जी. जगताप, डी.डी. लिम्हण, एस.ए. जावळे, के.आर. आरुटे, एस.व्ही. जम, आर.ए. इनामदार, एस.पी. बांबळे, एस.एम. गायकवाड यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुप्त खबर्याकडून हा खून शीतलच्या भावानेच केल्याची माहिती मिळाली. याबाबत लखनला विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता आरोपीने बहीण वारंवार सांगूनही मुलांसोबत मोबाईलवर बोलत असे व चार पाच मुलांना सारखी भेटत असे, हे सहन न झाल्याने 25 जून 2017 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिंदेगाव येथे त्याची बहीण लाडी उर्फ शीतल हिचा कुर्हाडीने खून केल्याची कबुली दिली.