बहुजनांनी अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची गरज

0
 विभागीय कामगार परिषदेत पदाधिकार्‍यांनी मांडले मत
 
भुसावळ : गेल्या अनेक वर्षांपासून गरीबीत जीवन जगत असणार्‍या बहुजनांना प्रत्येक वेळी डावलले जाते. त्यांना घटनेने दिलेला अधिकारही त्यांच्याकडून हिरावला जातो. अशावेळी न्याय मिळण्याकरिता बहुजनांनी आपल्या अन्यायाविरूध्द पेटून उठण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केले. भुसावळ येथील पीओएच कॉलनीतील जयंती मैदानावर विभागीय कामगार परीषद पार पडली. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव एन.बी. कुरणे होते.
आरएमबीकेएसचे चेअरमन सुनील भोसले यांनी उद्घाटन केले. व्यासपीठावर आरएमबीकेएसचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र इंगोले, असंघटीत क्षेत्र कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड, वेस्टर्न रेल्वे बहुजन कर्मचारी युनियनचे झोनल अध्यक्ष जतीन मकवाना, प्राथमिक शिक्षक नेते अशोक बार्‍हे, माध्यमिक शिक्षक नेते सुनील भिरूड, गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, गणेश पाटील, रवींद्र जावळे, अरूण म्हस्के आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. ही कामगार परीषद मध्य रेल्वे भुसावळ मंडळातर्फे महापरीनिर्वाण दिन, भीमा कोरेगाव शौर्य दिन व माता सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली.  भारतात हजारो कामगार संघटना ट्रेड युनियन असतांना मूलनिवासी बहुजन कर्मचारी व कामगार यांच्या समस्या आजही तशाच असून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची गरज का आहे याविषयीचे विश्‍लेषण विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या मनोगतातून केले. तसेच एससी, एसटी यांना आरक्षणात बढती देणे व नंतर त्यावर कोर्टात बंदी आणणे, ओबीसी यांना आरक्षणात बढती न देणे अर्थात एससी, एसटी व ओबीसी यांच्यात भांडणे लावणे हे एक षड्यंत्र या विषयावरदेखील विभागीय कामगार परीषदेत चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन आर.बी.परदेशी यांनी तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी मानले.