बहुजन क्रांती मोर्चाची प्रांत कार्यालयावर धडक

0

भुसावळ। शहरातील म्युनिसीपल हायस्कूलपासून प्रांत कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. एकच पर्व बहुजन सर्व, ‘इव्हीएम हटाओ, देश बचाओ’या घोषणा देत हातात विविध रंगांचे झेंडे घेत बहुजन समाजबांधवांनी शिस्तबद्धपणे बुधवार 12 रोजी दुपारी 1 वाजता मोर्चा काढला. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना अ‍ॅट्रासीटी कायदा अधिक कठोर करण्यात यावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सदस्य अनिल माने (सोलापूर) यांनी केले. म्युनिसीपल हायस्कूल येथे विविध जाती धर्म समाजाचे प्रतिनिधी व बहुजन समाजबांधव मोर्चासाठी जमले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आर.पी. तायडे यांनी मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला. कोणताही समाज व धर्माच्या विरोधात हा मोर्चा नसल्याचे ते म्हणाले. बहुजन एकतेचा संदेश पुढे न्यायचा असल्याचे ते म्हणाले. भिरुड म्हणाले की, मराठा आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात नाही.

मराठा समाजास आरक्षण आहे मात्र पदोन्नतीमध्ये आरक्षण नाही. त्यातच क्रिमीलेअर नॉनक्रिमीलेअर सारख्या जाचक अटी आहेत. तर बहुजन समाजबांधव आजही आर्थिक, सामाजिक क्षेत्रात गुलाम असल्याचे संजय भटकर म्हणाले. वाचनातून अस्मिता निर्माण झाली पाहिजे असे ते म्हणाले. मौलाना अनिस अहमद म्हणाले की, मुस्लिम समाज बांधव बामसेफ सोबत आहे. बहुजनांना संघटीत व्हायला वेळ लागेल असे ते म्हणाले. तर बहुजनांना विभाजीत करण्याचे शासनकर्त्यांचे षडयंत्र आहे.

एस.सी, एस.एसटींना तडीपार, मुस्लिमांना आतंकवादी, आदिवासींना नक्सलाईट बनविले जात आहे. तर शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागत आहे. शेतकर्‍याची आत्महत्या नसून हत्या असल्याचे बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सदस्य अनिल माने म्हणाले. मराठा समाजाला बहुजनांविरुद्ध रस्त्यावर उतरविले गेले. बहुजन क्रांती मोर्चा मराठा समाजाच्या आरक्षण विरोधात नसून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिले गेले पाहिजे अशी मागणी असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले. मोर्चाच्या यशस्वितेसाठी सुमित्र अहिरे, आनंद सपकाळे, राजेंद्र सुरवाडे, अरुण मस्के, समाधान जाधव, शेख हमीद संजय बांगर, रविंद्र बहाळे, ओंकार पाटील आदींनी परिश्रम घेतले.