भुसावळ । बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला मंजुरी द्यावी, बोदवडमधील उजनी बाबा दर्ग्याला पर्यटनस्थळाचा दर्जा घोषित करावा, शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली तसेच मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले.
प्रांतांची सकारात्मक चर्चा
रिपाइं (गवई) गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. प्रसंगी प्रांताधिकारी यांच्याशी निदर्शनकर्त्यांनी विविध विषयांवर विस्तृत चर्चा करून मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणीही केली. चिंचकर यांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे प्रसंगी आश्वासन दिले.
पुतळ्याचा तिढा पोलीस प्रशासनाने सोडवावा
बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील नियोजित जागेवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून तिढा सुटलेला नाही. कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करण पोलीस प्रशासनाने अहवाल दिला आहे मात्र भुसावळकरांच्या भावना लक्षात घेता पोलीस प्रशासनाने सकारात्मक अहवाल देऊन हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा राजू सूर्यवंशी यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
अशा आहेत मागण्या
शासनाचे मुंबईचे खंडपीठ भुसावळ बेंच हायकोर्ट म्हणून घोषित व्हावे, एमआयडीसीतील भूखंड बळकावून प्रस्थापित नावे लावून बंधनात ठेवणारे भूखंड बेरोजगारांना देण्यात यावे, शहरातील स्टॅम्प वेंडरांना नवीन तहसील कार्यालयात बसण्यास परवानगी द्यावी, भिलवाडी समोरील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करावी, मद्य विक्रेता अशोक नागराणी हे बनावट दारू विक्री करीत असल्याने सखोल चौकशी करण्यात यावी, रोजगार हमी योजनेंतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या निदर्शन आंदोलन विविध पक्षाच्या पदाधिकार्यांचा सहभाग होता.
यांची होती उपस्थिती
निदर्शन आंदोलनात शे.पापा शे.कालू, मुन्ना सोनवणे, सुदाम सोनवणे, अबरार ए.शेख, मुकेश गुंजाळ, बाळू सोनवणे, प्राचार्य विनोद गायकवाड, महादेव बोंडे, प्रकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, गोविंदा बोरसे, सुनील ठाकूर, दलितमित्र लालाजी ढिवरे, नमा शर्मा, मिलिंद कापडे, राजेश ठाकूर, निखील सपकाळे, अन्सार शाह, राकेश खरारे, अरुण साळुंके, सोनू पाटील, देवेंद्र ठाकूर, शुभम पचेरवाल, रोहित महाले, मनीष केदारे, राजेंद्र सोनवणे, चंदकांत वासनिक, रफिक खान, रितेश नायके, रवींद्र साळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.