बहुप्रतीक्षित ‘खजाना’ गझल महोत्सव यंदा २१, २२ जुलै रोजी ऑबेरॉयमध्ये!

0

मुंबई | द कॅन्सर एड असोसीएशन (सीपीएए), द पॅरेंटस असोशिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि द ओबेरॉय, मुंबई या तीन संस्थांनी मिळून कर्करोग आणि थॅलेसेमिक रुग्ण व मुलांसाठी निधी संकलन व्हावे म्हणून ‘खजाना’ या गझल महोत्सवाचे १६वे पर्व मुंबईमध्ये २१, २२ जुलै रोजी नरीमन पॉइंट येथील द ओबेरॉय हॉटेलमधील रिगल रूममध्ये आयोजित करण्यात आले आहे. ह्या महोत्सवाची घोषणा करण्यासाठी प्रख्यात गझल गायक पंकज उदास, भूपिंदर आणि मिताली सिंग, अनुप जलोटा, तलत अझीझ, गायिका रेखा भारद्धाज, गायक जावेद अली, पॅपोन, सुदीप बॅनर्जी, गायिका सोनम महापात्रा, गायक पार्थिव गोहिल, समीर दाते, गझलगायिका दिपाली दाते, पूजा गायतोंडे, गायत्री अशोकन, गझलगायक आभास जोशी, मिरांडे शाह, स्नेहा शंकर आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए)चे अध्यक्ष वाय के सप्रू आदी मान्यवर मुंबईत एकत्र आले होते.

‘खजाना– द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ ही गेली सोळा वर्षे यशस्वीपणे राबविली जात असलेली संकल्पना असून यांत गझल गायकांना आपली कला कलासक्त आणि रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी यथोचित असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गझलप्रेमींना भारतातील आघाडीच्या आणि नावाजलेल्या गझल गायकांच्या अदाकारीचा ऊंची आणि धारदार अनुभव दररोज सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या महोत्सवात घेता येणार आहे. हे सर्व कलाकार या महोत्सवामध्ये आपली अदाकारी सादर करणार आहेत.

“या अनोख्या अशा संकल्पनेसाठी पंकज उधास यांनी साधारण सोळा वर्षांपूर्वी भागीदारीत आयोजन करण्याची ऑफर देऊ केली, तेव्हा द ओबेरॉयच्या प्रयत्नांना ती सुयोग्य अशी दाद होती. ओबेरॉय, मुंबई अनेक वर्षांपासून कलाकारांच्या मदतीने अशाप्रकारे निधीसंकलन करत अली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाबरोबर संस्था राबवीत असलेला ‘टेरी फॉक्स रन’ उपक्रम असो की फाईन आर्टसला पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारी ओबेरॉय आर्ट कॅम्प असो, ओबेरॉय, मुंबईने नेहमीच मुंबईत सहाय्यभूत आणि स्वयंस्फुर्त असे नागरिकत्व पार पाडले आहे,” असे उद्गार ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉटस, मुंबईचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री देवेंद्र भारमा यांनी काढले. “भारतातील आघाडीचे गझल गायक गाणार असलेल्या या महोत्सवामध्ये ओबेरॉय, मुंबईला विशेष आनंद आणि अभिमान आहे कारण त्या माध्यमातून एका चांगल्या उद्देशासाठी काम करत राहणे शक्य होणार आहे. शिवाय त्यातून शहरातील वंचित घटकाला अत्यंत आवश्यक अशी मदत होणार आहे.”

पंकज उधास म्हणाले, “खजाना’ची १६ वर्षे साजरी करताना आणि त्याची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. म्हणूनच यावेळी ‘सेलीब्रेटिंग द मास्टर पोएटस… देन अँड नाऊ’ ही संकल्पना आम्ही राबवीत आहोत. मी या निमित्ताने ओबेरॉय, सर्व कलाकार, प्रायोजक आणि रसिकांचे अगदी हृदयापासून आभार मानतो. त्यांनी नेहमीच आम्हाला संपूर्ण सहकार्य दिले आहे.

‘खजाना’मध्ये गझलांची मेजवानीच रसिकांना मिळते आणि त्याद्वारे थॅलेसेमियाने ग्रस्त मुले आणि कर्करोग रुग्ण यांच्या उपचारासाठी निधी संकलन केले जाते. गेली तब्बल सोळा वर्षे हे आयोजन अविरतपणे केले जात असून ते अविस्वसनीय असेच आहे. यंदा आम्ही कवींच्या कार्याला सलाम करण्याच्या दृष्टीने या महोत्सवाची आखणी केली आहे. अनेक वर्षांपासून जे कवितेची सेवा करत आले आहेत आणि ज्यांनी रसिकांना भरभरून दिले आहे त्यांच्याप्रती ही कृतज्ञतेची भावना आहे. त्याशिवाय ज्यांनी एवढी वर्षे आम्हाला मदत करत हा बहुप्रतीक्षित महोत्सव यशस्वी करण्यामध्ये हातभार लावला त्यांच्याप्रतीही आभार करण्यासाठीचे हे आयोजन आहे,” असेही पंकज उधास यांनी म्हटले आहे.

यंदा आपण सर्व मिळून श्री भूपिंदर सिंगजी यांचा त्यांनी गझलमध्ये दिलेल्या अप्रतिम अशा योगदानासाठी गौरव करणार आहोत, असेही उधास यांनी नमूद केले आहे.

दोन दिवसांच्या या महोत्सवातून जो निधी उपलब्ध होणार आहे, तो कर्करोग आणि थॅलेसेमिया या रोगांनी त्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासाठी वापरला जाणार आहे. या कार्यक्रमासाठीच्या देणगी प्रवेशिका केवळ www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.

निधीसंकलनासाठी देणगी

या आयोजनामधून उभा राहणारा निधी हा कॅन्सर पेशंट्स एड असोसीएशन आणि पॅरेंट्स असोशिएशन थॅलेसेमिक युनीट ट्रस्ट यांना देणगीरूपाने दिला जाणार आहे. तब्बल ८१ लाख रुपयांचे संकलन झालेल्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाच्या देखण्या यशानंतर द ओबेरॉय, मुंबई आणि श्री पंकज उधास पुन्हा एकदा या दोन संघटनांच्या सहयोगाने संयुक्तपणे हे आयोजन करत आहेत. त्याद्वारे या कलात्मक प्रयत्नामध्ये आणि एक मैलाचा दगड साध्य होत आहे.