बहुमताअभावी जि.प.त रस्सीखेच

0

कोल्हापूर । महालक्ष्मीच्या कोल्हापूरात यावेळी जिल्हापरिषदवर कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सर्व पक्षांची सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामध्ये महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तर सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील मुत्सद्देगिरीचा सामना या निमित्ताने होणार आहे. ही रस्सीखेच जरी सुरू असली तरी सर्व सुत्रे मात्र शिवसेनेच्या हाती आहे.मातोश्रीवरून जे ‘आदेश ’ येतात त्यावरुन निर्णय स्पष्ट होईल. मातोश्रीवरून येणार्‍या आदेशाने जिल्हा परिषदेच्या सत्तेची तिजोरी उघडली जाणार आहे. निकाल त्रिशंकू लागल्याने स्थानिक पातळीवर कितीही प्रयत्न केले तरी मुंबईचा ‘आदेश’ हाच सर्वस्वी निर्णायक ठरणार आहे.मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण कसे रंग धारण करते यावरच येथील जिल्हा परिषदेचा सत्ताबाजार अस्तित्वात येणार आहे.

सत्तासोपान गाठण्यासाठी 34 हा जादुई आकडा लागणार
महालक्ष्मीचे कोल्हापूर हे आमचे त्यामुळे येथील जिल्हापरिषदेवर झेंडा आमचाच अशी बाता निवडणुकीपुर्वी सर्वच पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी जोरजोरात मारल्या होत्या.मात्र निकाला नंतर सर्वांना जिल्हा परिषदेवर आपला झेंडा लागण्याचे दावे फोल ठरले. अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी यश मिळाल्याने उसने अवसान आणून आनंद व्यक्त करावा लागला. जोडीलाच सत्ता मिळवण्याचे दावेही रंग धारण करू लागले आहेत. दाव्यांमध्ये कितीही दमदारपणा असला तरी या क्षणी त्यात भरीवपणाचा अभाव दिसत आहे. याचे कारण सत्तासोपान गाठण्यासाठी लागणारा 34 हा जादुई आकडा जमवणे. आज याचीच उणीव स्पष्टपणे जाणवत आहे. भाजप व दोन्ही काँग्रेस यांची आजच्या घडीला 27 जागांच्या आसपास गोळाबेरीज होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उघड चाललेल्या हालचाली प्रभावी दिसत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी हालचालीत ‘गनिमी कावा’ ठेवला आहे. पालकमंत्र्यांचे मंत्रिमंडळातील स्थान, केंद्र व राज्यातील सत्ता, त्याचा स्थानिक विकासासाठी होणारा लाभ या पाठिबा देणार्‍या अन्य पक्षांना जमेच्या बाजू ठरणार आहेत. त्याआधारे त्यांनी शिवसेना व राजू शेट्टी यांना मदतीची हाक घातली आहे. शिवसेना व शेट्टी यांची भाजप व चंद्रकांत पाटील यांच्या कामकाज, रणनीतीतील असणार्‍या विरोधावर. निवडणूकपश्चात वातावरण सल झाले असले तरी शिवसेना व शेट्टी यांचा पालकमंत्र्यांवरील आक्षेप, राग कमी झाल्याचे कोठेही जाणवत नाही. अशा स्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्यातील मुत्सद्देगिरीचा सामना रंगतदार ठरणार आहे.

मातोश्रीची भूमिकाच निर्णायक
जिल्हा परिषदेतील सत्तेचे त्रांगडे सुटणे हे पूर्णत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी सेनेच्या शिरस्त्याला धरून तसे सांगूनही टाकले आहे. ठाकरे यांच्या राजकारणात मुंबई महापालिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या महापालिकेत शिवसेना व भाजप यांचे सत्तेचे गोत्र कसे जमते यावरच कोल्हापुरातील जिल्हा परिषदेतील भाजप-शिवसेना यांचे शुभमंगल होणार हे निश्चित.