मुंबई: अजित पवार यांनी सहकार्य करण्याचे ठरविले. त्यांनी पत्र दिल्याने आम्ही सरकार स्थापन केले. मात्र आज कोर्टाचा निर्णय आला. उद्या बहुमत सिद्ध करायचा आहे. त्यावेळी अजित पावर यांनी मला राजीनामा देणार असल्याचे सांगितले. त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलेले नसल्याने आम्ही देखील सत्तेत राहू शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे फडणवीस हे देखील राजीनामा देतील अशी शक्यता होती, अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यपालांकडे जाऊन ते राजीनामा देणार आहे.
तीनचाकी रिक्षा प्रमाणे आघाडीची अवस्था होईल
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने सरकार बनवायचे ठरविले असल्याने त्यांना शुभेच्छा पण तीनचाकी रिक्षा प्रमाणे या महाविकास आघाडीची अवस्था होईल हे मी दाव्याने सांगतो असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उत्तम विरोधी पक्ष म्हणून आगामी काळात भूमिका बजावू असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपला दूर ठेवणेच किमान समान कार्यक्रम
राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने केवळ किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यातच वेळ वाया घातले. सत्ता स्थापनेचा किमान समान कार्यक्रम म्हणजे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावरच चर्चा झाली. दुसरे काहीही या तिन्ही पक्षांना करता आले नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.