बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत नाही; भाजपचे गौप्यस्फोट !

0

मुंबई: शनिवारी २३ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला समर्थन दिल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर राज्यपालांनी भाजपला ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात होते. मात्र राज्यपालांनी कोणतीही मुदत दिलेली नसून मुदत दिल्याची निव्वळ अफवा असल्याचा खळबळजनक दावा भाजपकडून करण्यात आले आहे. अधिकृतरित्या राज्यपालांनी कोणतीही मुदत दिलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

विश्वासदर्शक ठरावासाठी १४ दिवसांची मुदत दिली असल्याचे सांगण्यात येत असून ७ डिसेंबरपर्यंत ही मुदत असल्याचे सांगितले जात आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेत तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी अद्याप कोर्टाकडून मान्य करण्यात आलेली नाही. कोर्टाने काल आणि आज सुनावणी पूर्ण करून उद्या १०.३० वाजेपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.

आजच सकाळी महाविकास आघाडीतर्फे भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही तर सत्ता स्थापनेसाठी बोलवावे यासाठी राज्यपालांना पत्र दिले आहे. १६२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देत महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला आहे.