पुणे : दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचा पोलिस प्रशासनाचा प्रयोग पुण्यात पुन्हा एकदा फसला आहे. काँग्रेस पक्षाने सक्तीला तीव्र विरोध केला तर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन हेल्मेट विरोधी कृती समितीमार्फत लढा चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
नववर्षाच्या प्रारंभापासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती राबविणे चालू केले . गेल्या पंधरा दिवसांपासून सक्तीचे आदेश बजावण्यात आले होते.परंतु आज मंगळवारी पहिल्या दिवशी प्रमुख रस्त्यावर सकाळी फेरफटका मारला तेव्हा हेल्मेटधारकांची संख्या अगदी तुरळक वाढल्याचे आढळले. काही दुचाकीस्वार मिरवणुकांनी गेले ते सुद्धा हेल्मेट परिधान न करता गेल्याचे दिसले. पोलीस अधिकारी पुण्यात आले की हेल्मेट सक्ती राबवू पहातो, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये होती. दुचाकीवर येथील जीवनमान अवलंबून आहे, सर्वाधिक दुचाकी असणारे हे शहर आहे. मध्यवस्तीतील छोट्या रस्त्यांवर २० किमीपेक्षा अधिक वाहनांचा वेग ठेवता येत नाही त्यामुळे हेल्मेट वापरणे व्यवहार्य ठरत नाही, हेल्मेट वापरणे ऐच्छिक असावे त्याची सक्ती नको अशी साधारण भावना पुणेकरांची आहे. हेल्मेट सक्तीसाठी महाविद्यालयीन तरुणांना पोलीस खाते वेठीस धरत असल्याच्या तक्रारी आहेत. कॉलेज परिसरातील मार्गावर पाच दहा पोलीसांचा घोळका उभा रहातो आणि विद्यार्थ्यांना पकडून जबर दंड वसूल करण्याचे प्रकार चालू असल्याच्या तक्रारी पुणेकरांनी केल्या.
यापूर्वी हेल्मेट सक्ती राबविण्याचे प्रयत्न झाले तेव्हा भाजपचे नेते विरोधात होते सध्या ते कुठे गेले ? अशीही चर्चा चालू आहे.