बांगलादेशच्या युवा वेगवान गोलंदाजाची अनोखी इच्छा

0

ढाका: चार महिन्यांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीमध्ये बांगलादेशच्या संघात पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज कामरुल इस्लाम रबीने भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी एक अनोखी इच्छा व्यक्त केली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची विकेट मिळविण्याचे माझे स्वप्न असल्याचे कामरुल म्हणाला. नुकतेच बांगलादेशच्या संघाने न्यूझीलंडच्या कसोटी संघाशी दोन हात केले. या सामन्यात किवींचा कर्णधार केन विल्यमसन याची विकेट घेण्याची तयारी कामरुल याने केली होती. कामरुल याला यात यश देखील आले. कामरुलने आपल्या जबरदस्त आऊटस्विंगरच्या जोरावर विल्यमसनची विकेट घेतली होती. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाविरुद्ध आगामी काळात बांगलादेशचा एक कसोटी सामना होणार आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भारतीय संघाचा बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे. मिरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कामरुल म्हणाला की, विल्यमसनच्या कमकुवत बाजूचा मी अभ्यास केला होता. आऊट साईड द ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱया आऊटस्विंगवर विल्यमसन आपली विकेट टाकून बसतो, हे मला कळले होते. त्यानुसार मी गोलंदाजी केली आणि यश देखील आले. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूच्या फलंदाजीचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असेही कामरुल म्हणाला. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कमकुवत बाजू शोधून काढणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते, असे मला सांगण्यात आले आणि त्यानुसार मी तयारी देखील केली. प्रतिस्पर्धी संघातील मोठ्या खेळाडूला बाद करण्याची प्रत्येक गोलंदाजीची इच्छा असतेच, मी जेव्हा गोलंदाजी करायला सुरूवात केली. तेव्हा सचिन तेंडुलकरला आपण बाद करावे, असे स्वप्न होते. ते माझे खूप मोठे यश ठरले असते, पण सचिन त्याआधीच निवृत्त झाल्याचे माझे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र, आगामी कसोटीत विराट कोहलीची विकेट मला मिळाली तर ते देखील माझ्यासाठी खूप मोठे यश ठरेल. कारण, सध्याच्या घडीला भारतीय संघाचा कर्णधार जगातील सर्वोत्तम फंलदाजांपैकी एक समजला जातो, असे कामरुल म्हणाला.