कोलकाता: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या डे-नाइट कसोटीत भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर एका डावाने विजय मिळवला. बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून भारतीय संघाने याही मालिकेत वर्चस्व कायम ठेवले आहे. या कामगिरीसह विराट कोहलीने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. भारतीय संघ मायदेशात आतापर्यंत सलग 12 कसोटी मालिका जिंकले आहेत. बांगलादेशच्या पहिल्या डावातील 106 धावांच्या भारताने पहिला डाव 9 बाद 347 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशला दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही.
कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटने पाचवे स्थान पटकावले आहे. त्याने अॅलन बॉर्डर यांचा 32 विजयांचा विक्रम मोडला. विराटच्या नावावर कर्णधार म्हणून 33 विजय आहेत. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ ( 53), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग ( 48), स्टीव्ह वॉ ( 41) आणि वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड ( 36) आघाडीवर आहेत.
डावाच्या फरकाने कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये विराटने क्लाईव्ह लॉईड, स्टीफन फ्लेमिंग आणि अँण्ड्य्रू स्ट्रॉस यांच्या 11 विजयांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमातही स्मिथ 22 विजयासह आघाडीवर आहे. त्यानंर स्टीव्ह वॉ ( 14) आणि पीटर मे ( 12) यांचा क्रमांक येतो.