नवी दिल्ली । बांगलादेशविरुद्ध 9 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत हैदराबादमध्ये रंगणार्या एकमेव कसोटी सामन्यासाठी मंगळवारी भारताचा 16 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला. मुकुंदला राखीव सलामीवीर म्हणून संधी मिळाली आहे. तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला जवळजवळ सहा वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पाचारण करण्यात आले. संघनिवडीचा विचार करता तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला संघात पाचारण करण्यात आले असून वृद्धिमान साहाने पार्थिव पटेलचे स्थान घेतले. मुकुंदने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 700 पेक्षा अधिक धावा फटकावित निवड समितीचे लक्ष वेधले. 2011 मध्ये इंग्लंड व वेस्ट इंडिज दौर्यानंतर मुकुंदला आता संधी मिळाली. मुकुंदचा अपवाद वगळता संघात विशेष बदल नाही. दुखापतीतून सावरलेले अजिंक्य रहाणे, जयंत यादव, हार्दिक पांड्या यांना संघात स्थान मिळाले आहे.
शर्मा, कुमार, यादव संभाळणार गोलंदाजी
मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, आर. आश्विन, रवींद्र जडेजा अपेक्षेप्रमाणे संघात आहेत. ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार व उमेश यादव वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहेत. अतिरिक्त फिरकीपटू म्हणून मिश्राची निवड करण्यात आली आहे. सलामीसाठी केएल राहुल आणि मुरली विजय हे दोन फलंदाज असताना अभिनव मुकुंदला पुनरागमनाची दिलेली संधी काहीशी अनपेक्षित ठरली आहे. रणजी स्पर्धेत त्याने 14 सामन्यांत 65.30 च्या सरासरीने चार शतके आणि तीन अर्धशतकांसह 849 धावा केल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या इराणी सामन्यात शेष भारत संघातून तो अपयशी ठरला होता. यंदाच्या रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्या गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाळचा मात्र विचार करण्यात आला नाही. मात्र त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारत अ संघातून स्थान देण्यात आले आहे. भारत अ संघाचा हा सामना मुंबईत 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. हार्दिक पंड्या या संघाचे नेतृत्व करणार आहे.
बैठकीला 6 तास विलंब
निवड समितीची बैठक जवळजवळ सहा तास उशिराने सुरू झाली. बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांनी (सीओए) सहसचिव अमिताभ चौधरी यांना बैठकीचे संचालन करण्यापासून रोखले. अनेक फोन कॉल्स व ई-मेल्सची आदानप्रदान झाल्यानंतर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी बैठकीचे संचालन केले.
भारतीय संघातील खेळाडू
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अभिनव मुकुंद, हार्दिक पांड्या.