मुंबई: सध्या देशात सीएए, एनआरसी वरून वातावरण तापले असून अनेक ठिकाणी या कायद्याला विरोध प्रदर्शन सुरु आहे. मुंबईतील वर्सोवा भागात महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून शहरात पोष्टर लावण्यात आले असून, बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. वर्सोवा भागात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या देशात निघून जाण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनात भारतातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.
तर याच मागणीसाठी मनसेच्या वतीने 9 फेब्रवारीला मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र त्या आधीच आता वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना ‘मनसे’ने इशारा देत तुमच्या देशात निघून जा अशा आशयाचे पोस्टर वर्सोव्यात परिसरात लावण्यात आलेले आहेत. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची नावे या पोस्टरवर आहेत.